नाशिक : चोरट्यांनी आता वाहनधारकांना आपले लक्ष केले असून, पैसे घेवून घरातून अथवा बँकेतून बाहेर पडणा-या नागरीकांच्या वाहनांवर पाळत ठेवली जात आहे. मंगळवारी (दि.१०) वेगवेगळय़ा भागात घडलेल्या दोन घटनांमध्ये पार्क केलेल्या वाहनांमधून तब्बल पावणे तीन लाखाची रक्कम लांबविण्यात आली. याप्रकरणी मुंबईनाका आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडाळा रोडवरील जलसा किराणा भागात राहमारे नासीर हमिद शेख हे मंगळवारी दुपारच्या सुमारास परिसरातील बरकत हॉटेल भागात गेले होते. मोबाईल दुकानासमोर आपली कार पार्क करून ते अल्पावधीसाठी नजीक गेले असता ही घटना घडली. पार्क केलेल्या कारच्या ड्रायव्हर सिटाखाली ठेवलेली बॅग चोरट्यांनी उघड्या खिडकीतून चोरून नेली. या बॅगमध्ये १ लाख २० हजार रूपयांची रोकड आणि महत्वाची कागदपत्र असा ऐवज होती. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक जावेद शेख करीत आहेत. दुसरी घटना पंचवटी कारंजा भागात घडली. नवीन आडगाव नाका भागात राहणारे जमनभाई वल्लभभाई गेडीया (६५) मंगळवारी पंचवटी कारंजा भागात आले होते. बँकेतून पैसे काढून ते घराकडे परतत असतांना ही घटना घडली. स्कुटी पेप (जीजे १५ एसी १३३९) या दुचाकीने प्रवास करीत असतांना वाटेत ते फळ घेण्यासाठी थांबले असता चोरट्यांनी रोकड असलेल्या बॅगेवर डल्ला मारला. साईबाबा फ्रुट या दुकानासमोरील रस्त्यावर दुचाकी पार्क करून ते फळ घेण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी स्कुटीच्या डिक्कीत ठेवलेली बॅग चोरून नेली. या बॅगेत दीड लाख रूपयांची रोकड होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गवळी करीत आहेत.