नाशिक : क्रेडिट कार्ड अपग्रेड करण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून भामट्यांनी बँक ग्राहकाचे तब्बल दोन लाख रूपये आॉनलाईन लांबविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. विशेष म्हणजे क्रेडिट कार्डची गोपनिय माहिती न देताही भामट्यांनी सदरची रक्कम डेबिट करून घेत परस्पर काढून घेण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतिष श्रीकिसनदास मालाणी (५७ रा.इंदिरानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मालाणी यांच्याशी ३ मार्च रोजी वेगवेगळय़ा मोबाईलवरून भामट्यांनी संपर्क साधला होता. एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे भासवून भामट्यांनी क्रेडिट कार्ड अपग्रेड करीत असल्याचे सांगितले. यावेळी मालाणी यांच्याकडे गोपनीय माहिती मागण्यात आली. परंतू संभाव्य धोका ओळखून मालाणी यांनी माहिती देण्यास नकार दिला. तरीही सदर व्यक्तींनी बोलण्यात गुंतवून ही रक्कम लांबविली. मालाणी यांनी फोन ठेवताच भामट्यांच्या क्रेडिट कार्डवरून दोन लाखाची रक्कम डेबिट करून घेत सदरची रक्कम अन्य खात्यात वर्ग करून परस्पर लांबविली ही बाब लक्षात येताच मालाणी यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपरकारी करीत आहेत.