तोतया पोलीसांंनी पावणे दोन लाख रुपयाच्या सोन्याच्या बांगड्या केल्या लंपास
नाशिक : तोतया पोलीसांनी रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या सुमारे पावणे दोन लाख रूपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्या. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे भामट्यांचा शोध घेत आहेत. सुशिला सुरेश गुजराथी (रा.ओमनगर,हिरावाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गुजराथी या मंगळवारी (दि.१०) देवदर्शनासाठी घराबाहेर पडल्या होत्या. परिसरातील मंदिरात देवदर्शन आटोपून त्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. खोडेनगर येथील राजलक्ष्मी बँक भागात दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. पोलीस असल्याची बतावणी करीत पुढे चेकिंग चालू आहे. एवढे दागिणे घालून का फिरतात असे म्हणत हातातील बांगड्या काढण्यास भाग पाडले. यावेळी पिशवीत दागिणे टाकण्यासाठी मदतीचा बहाणा करून भामट्यांनी १ लाख ७५ हजार रूपये किमतीच्या बांगड्या हातोहात लांबविल्या. अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.
पॉलीश करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी सोन्याचे दागिणे केले लंपास
नाशिक : पॉलीश करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी सोन्याचे दागिणे हातोहात लांबविल्याची घटना गौळाणेरोड भागात घडली. कुकरमध्ये हाळदी कुंकू टाकण्याच्या बहाण्याने सोन्याची दुपदरी पोत आणि कानीतील झुबे असा सुमारे सव्वा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारण्यात आला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिता ज्ञानेश्वर विरेकर (४० रा.कचरा डेपो जवळ,गारोबा काका नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विरेकर या मंगळवारी (दि.१०) आपल्या घरात एकट्या असतांना दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. दागिणे पॉलीश करून देण्याची बतावणी करीत त्यांनी महिलेचा विश्वास संपादन करून दागिणे लांबविले. कुकरमधील उकळत्या पाण्यात हळदी कुंकू टाकून त्या मिश्रणात संशयीतांनी महिलेची दुपदरी सोन्याची पोत आणि कानातील झुबे टाकले. यावेळी महिलेची नजर चुकवून संशयीतांनी दागिणे हातोहात लांबविले. संशयीतांच्या सांगण्यानुसार काही वेळात महिलेने कुकर उघडला असता ही घटना समोर आली. अधिक तपास हवालदार पथवे करीत आहेत.
…