औद्योगीक वसाहतीत अडीच लाख रूपये किमतीचे तांब्याचे स्पेअर पार्ट चोरीला
नाशिक : औद्योगीक वसाहतीत भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला असून एका कंपनीतील मटेरियल स्टोअरचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रूपये किमतीचे तांब्याचे स्पेअर पार्ट चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद बुधा पवार (रा.जाखडीनगर रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पवार अंबड औद्योगीक वसाहतीतील पॉवर ब्रम्हाणी या कारखान्याचे काम बघतात. २५ जुलै ते ८ ऑगष्ट दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कारखान्यातील मटेरियल रूमच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून २ लाख ४१ हजार १३८ रूपये किमतीचे तांब्याचे स्पेअरपार्ट चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
…
तडीपारास पोलीसांनी केले जेरबंद
नाशिक : शहर व जिह्यातून हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलीसांनी जेरबंद केले. ही कारवाई नाशिकरोड येथील उत्सव मंगल कार्यालय भागात करण्यात आली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पराग राजेंद्र गायधनी (२९ रा.पुरूषोत्तम शाळेजवळ) असे संशयीताचे नाव आहे. गायधनी याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे पोलीसांनी त्यास शहर आणि जिह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच मंगळवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास तो उत्सव मंगल कार्यालय भागात मिळून आला. याप्रकरणी पोलीस शिपाई पंकज भास्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार साळवे करीत आहेत.
…..
मद्याच्या नशेत पायघसरून साडीच्या झोक्यावर पडल्याने मृत्यू
नाशिक : मद्याच्या नशेत पायघसरून साडीच्या झोक्यावर पडल्याने फास लागून २८ वर्षीय तरूणाचा मृत्यु झाला. ही घटना चुंचाळे शिवारात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राहूल रघुनाथ आळणे (रा.बिल्डींग क्र.६ घरकुल योजना) असे मृत तरूणाचे नाव आहे. राहूल आळणे यास दारूचे व्यसन होते. मंगळवारी (दि.१०) सकाळी नेहमी प्रमाणे दारूच्या नशेत तर्रर्र होवून घरी आला. यावेळी अचानक पाय घसरून तो घरात बांधलेल्या साडीच्या झोक्यावर पडला. मात्र या घटनेत त्यास फास लागला. ही बाब लक्षात येताच आई पार्वताबाई आळणे यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.