फोनवर बोलत असतांना दुचाकी पळविली
नाशिक : फोनवर बोलत असतांना पार्क केलेली दुचाकी दोघा भामट्यांनी पळवून नेल्याची घटना जेहान सर्कल भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. संतोष पंडीत रोकडे (रा.वासळीगाव,त्र्यंबकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रोकडे रविवारी (दि.८) शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास ते काम आटोपून घराकडे परतत असतांना ही घटना घडली. गंगापूररोडने प्रवास करीत असतांना मोबाईलवर त्यांना फोन आला. अतुल दुध डेअरी नजीकच्या बस थांब्यावर दुचाकी एमएच १५ सीजी ०८०६ पार्क करून ते मोबाईलवर बोलत असतांना दुचाकीवर आलेल्या दोघां भामट्यांपैकी एकाने त्यांची पॅशन मोटारसायकल पळवून नेली. अधिक तपास पोलीस नाईक मोहिते करीत आहेत.
रिक्षाप्रवासात महिलेची रोकड लांबविली
नाशिक : पतीच्या बँकखात्यात पैसे भरण्यासाठी जाणा-या महिलेच्या पर्स मधील रोकडवर रिक्षातील सहप्रवासी असलेल्या दोघा भामट्या महिलांनी डल्ला मारल्याची घटना दिंडोरीरोड भागात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना जगदिश सोनवणे (रा.वणी ता.दिंडोरी) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे या सोमवारी (दि.९) शहरात आल्या होत्या. कॅनडा कॉर्नर भागातून त्या पैसे घेवून दिंडोरीरोड येथील एका बँकेत जात असतांना ही घटना घडली. रिक्षाने प्रवास करीत असतांना रविवार कारंजा भागात दोन महिला व एक लहान मुलगा रिक्षात बसला. प्रवासात भामट्या महिलांपैकी एका महिलेने त्यांच्या पर्स मधील ६७ हजार ५०० रूपयांची रोकड हातोहात लांबविली. हा प्रकार रिलायन्स पेट्रोलपंप भागात महिला रिक्षातून उतरून बँकेत गेली असता निदर्शनास आला. अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत.