पूर्व वैमनस्यातून कारने दिली धडक; कारचालकासह तीघांना पोलीसांनी केली अटक
नाशिक : पूर्व वैमनस्यातून भरधाव कारने दुचाकीस्वारांना उडविल्याची घटना मायको सर्कल भागात घडली. या घटनेत दोन तरूण जखमी झाले असून,याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारचालकासह तीघांना पोलीसांनी अटक केली आहे. हर्षद सुनिल पाटणकर (२२), गोपाल राजेंद्र नागोलकर (२१), मयूर दिनेश जाधव (२३ रा.शरणपूररोड) व हेमंत प्रकाश महाले (२२ रा.त्रिमुर्ती चौक,सिडको) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी विनायक उत्तम गायकवाड (२५ रा.विनयनगर,इंदिरानगर) या तरूणाने तक्रार दाखल केली आहे. गायकवाड व त्याचे मित्र चिन्मय पाटील,विशाल गाडेकर आदी रविवारी (दि.८) रात्री मायको सर्कल मार्गे मुंबईनाकाच्या दिशेने एमएच १५ एच के ६५४८ या मोपेड दुचाकीवर ट्रिपलसिट प्रवास करीत असतांना ही घटना घडली. संशयीत पाटणकर आणि दुचाकीवरील गाडेकर यांच्यातील जुन्या वादातून स्विफ्ट कारमधून आलेल्या टोळक्याने दुचाकीस धडक दिली. या अपघातात तिघे दुचाकीस्वार जमिनीवर पडले असता संशयीतांनी आपली कार माघारी फिरवून हातात धारदार शस्त्र घेवून जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर कार घातली. या अपघातात गाडेकर आणि चिन्मय पाटील यांचे पाय फॅक्चर झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
महिलेच्या गळयातील मंगळसूत्र ओरबाडले
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या ७० वर्षीय महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना सरस्वतीनगर भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकुंतला तानाजी जाधव (रा.शेलू ता. चांदवड) यांनी तक्रार दाखल केली आहे. जाधव या सोमवारी (दि.९) नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आल्या होत्या. सरस्वतीनगर येथील जैन भवन येथून त्या प्रमोद महाजन गार्डन मार्गे बळी मंदिराच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ९० हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
तरूणावर हल्ला चौघांना अटक
नाशिक : भावाचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तरूणावर एकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना पेठरोडवरील फुलेनगर भागात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. भारत शिंदे,कृष्णा चव्हाण,रोहित शिंदे,राहूल शिंदे (रा.सर्व फुलेनगर,पेठरोड) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी अनिल वसंत सावंत (२२ रा.मच्छीबाजार,फुलेनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. सावंत रविवारी (दि.८) रात्री कामावरून आपल्या घरी जात असतांना वाटेत संशयीत सावंत यांच्या भावास शिवीगाळ करीत होते. त्यामुळे अनिल सावंत वाद मिटविण्यासाठी गेले असता संशयीतांनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत एकाने त्यांच्या डोक्यात कोयता मारून जखमी केले. अधिक तपास उपनिरीक्षक नेमाणे करीत आहेत.