पळवून नेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नाशिक : गुजरात राज्यात पळवून नेत एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरण,बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर पाटील (रा.उदना लिंबायत सुरत) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी चेतना नगर भागात राहणा-या आपल्या मावशीकडे राहते. दि.२८ जुलै रोजी संशयीताने तिला फुल लावून पळवून नेले होते. दोन दिवस सुरत येथील एका चाळीतील घरात तिच्यावर बळजबरीने बलात्कार करण्यात आला. यानंतर संशयीताने दमदाटी करून मुलीस घरी सोडल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
महिलेचा विनयभंग मुलास मारहाण
नाशिक : मारहाणीत मुलाच्या मदतीला धावून गेलेल्या महिलेचा त्रिकुटाने विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकबर शेख,अल्पराज शेख व आयाज शेख (रा.सर्व जगतापवाडी,गांधीनगर आगरटाकळी) अशी मायलेकास मारहाण करीत विनयभंग करणा-या संशयीतांची नावे आहेत. रविवारी (दि.८) रात्री पीडित महिलेच्या घराशेजारी असलेल्या ताज बिल्डर्स कार्यालय परिसरात संशयीत गोंधळ घालत होते. यावेळी पीडितेच्या लहान मुलाने त्यांना टोकले असता ही घटना घडली. आरडाओरडचा आवाज आल्याने मुलाने तेथे जावून काय प्रकार आहे अशी विचारपूस केली असता त्रिकुटाने शिवीगाळ करीत त्यास बेदम मारहाण केली. मुलाच्या आवाजाने धावून आलेली माता त्यांना समजवून सांगत असतांना संशयीतांनी तिचा विनयभंग केला. या घटनेत लहान मुलाच्या डाव्या हातास आणि तोंडास दुखापत झाली असून अधिक तपास जमादार परदेशी करीत आहेत.