रिक्षातून आलेल्या टोळक्याने कारचालकास लुटले
नाशिक : रिक्षातून आलेल्या टोळक्याने कारचालकास बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना औद्योगीक वसाहतीत घडली. या घटनेत धारदार चाकू मारून टोळक्याने रोकडसह मोबाईल असा सुमारे ४३ हजाराचा ऐवज पळविला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर वाटोरे, अविनाशा रणदिवे, संतोष पालवे, सोनू गांगुर्डे अशी लुटमार करणाºया टोळक्याची नावे आहेत. याप्रकरणी भागवत बाबुराव गायकवाड (रा.गंगासागरनगर,श्रमिकनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गायकवाड शानिवारी (दि.७) रात्री औद्योगीक वसाहतीतील वुड क्रॉप कंपनीसमोरून सेन्ट्रो कार एमएच १५ डीसी ८५२४ मधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. वाटोरे याच्या अॅटोरिक्षातून आलेल्या संशयीतांनी कार अडवित गायकवाड यांना कारबाहेर काढून बेदम मारहाण केली. यावेळी टोळक्यातील एकाने धारदार चाकूने जखमी केले असता उर्वरीतांनी त्यांच्या खिशातील ४० हजार रूपयांची रोकड आणि मोबाईल बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत.
गोडावूनमधून स्पेअरपार्टची चोरी
नाशिक : गोडावून मधील स्पेअरपार्टवर नोकरानेच डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. साथीदाराच्या मदतीने नोकराने ही चोरी केली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण दगडू भामने (३० रा.दत्तमंदिर,ना.रोड) व राहूल प्रकाश शिंगोरे (३० रा.गंगोत्री बंगला,ना.रोड) अशी गोडावून मधील स्पेअरपार्टवर डल्ला मारणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी धनाराम मोडाराम चौधरी (रा.काठेगल्ली) यांनी तक्रार दाखल केली आहे. चौधरी यांचे खरबंदा पार्क येथे राजेश्वर अॅटो पार्टस नावाचे दुकान आहे. या दुकानात प्रविण भामने हा काम करतो. शनिवारी (दि.८) दुपारच्या सुमारास भामने हा मित्राच्या मदतीने चोरी करतांना मिळून आला. संशयीतांनी सुमारे १० हजार रूपये किमतीचे स्पेअर पार्ट चोरून नेले. अधिक तपास हवालदार आाडके करीत आहेत.
डंपरमधून लिक्वीडची चोरी
नाशिक : पार्क केलेल्या डंपरमधून चोरट्यांनी लिक्वीड चोरून नेल्याचा प्रकार चारणवाडी भागात घडला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल महादेव घुले (रा.चारणवाडी ता.जि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. घुले यांनी लिक्वीडने भरलेला डंपर शनिवारी (दि.७) रात्री आपल्या घरासमोर पार्क केला असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेल्या डंपरचा दरवाजा उघडून कॅबीन मध्ये ठेवलेल्या सुमारे दोन हजार रूपये किमतीच्या एन.ब्ल्यू. लिक्वीडने भरलेल्या प्लॅस्टीकच्या सिलबंद बादल्या चोरून नेल्या.अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.