नाशिक : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, वेगवेगळ्या भागात झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्याचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पेठरोडवरील शिवांजलीनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४३ हजाराच्या मुद्देमालावर डल्ला मारला. शोभा कैलास खैरनार (रा.शिवालय बंगला) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खैरणार कुटुंबिय ५ ते ८ ऑगष्ट दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून व लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व हॉलमधील एलईडी टीव्ही आणि बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४३ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत. दुसरी घटना दिंडोरीरोड भागात घडली. मोराडे जेलसेवा भागात राहणा-या वृषाली दिपक पुराणीक (रा.कृष्णा व्हॅली अपा.) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पुराणीक कुटूंबिय शनिवारी (दि.७) बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सुमारे ७० हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आाली असून अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत. मायको सर्कल भागातील एकाच इमारतीतील दोन खासगी कार्यालय फोडून चोरट्यांनी सुमारे ३८ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी स्मिता काशिनाथ वाणी (रा.चारवाक चौक,इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. वाणी मायको सर्कल येथील इंडस अपार्टमेंटमध्ये एका कार्यालयाचे कामकाज पाहता. शनिवारी (दि.६) रात्री चोरट्यांनी या भागात धुमाकूळ घातला. रविंद्र खैरनार अणि रेश्मा काटे यांचे कार्यालयाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कार्यालयातील संगणक, सात हार्डडिक्स आणि महत्वाची कागदपत्र असा सुमारे ३७ हजार ७०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.