कर्जाच्या बहाण्याने युवकाला अडीच लाखांचा गंडा
नाशिक – कर्ज देण्याच्या बहाण्याने भामट्याने युवकास सुमारे अडीच लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रिजेश परशुराम सिंग (२६, रा. टाकळी रोड) यांच्या फिर्यादीनुसार १९ ते २३ जुलै दरम्यान भामट्याने फोन व इंटरनेटवरून गंडा घातला. भामट्याने ब्रिजेश यांच्यासोबत संपर्क साधून त्याने बजाज फिनसरीच्या नावे वैयक्तीक कर्ज देण्याचे आमीष दाखवले. या आमिषाला बळी पाडण्यासाठी भामट्याने ब्रिजेश यांना खोटी कागदपत्रे पाठवली. तसेच कर्ज घेण्यासाठी वेगवेगळे शुल्क द्यावे लागेल असे सांगून भामट्याने ब्रिजेश यांच्याकडून वेळोवेळी २ लाख ३७ हजार ८४४ रुपये घेत गंडा घातला. पैसे भरूनही कर्ज न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ब्रिजेश यांनी सायबर पोलिसांकडे फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे.
धक्का लागल्याच्या कुरापत काढून वार
नाशिक – दिंडोरी रोड वर भवानी पार्क अपार्टमेंट मध्ये धक्का लागल्याची कुरापत काढून एकावर शस्त्राने वार करून जखमी करणाऱ्या तिघा संशयितांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. उमेश विजय रावल (२१, रा. फुलेनगर), लखन शिंदे व बाळा कोंदे असे या संशयितांचे नाव आहेत. पवन सुभेदार गुप्ता (२७, रा. भवानी पार्क, दिंडोरी रोड) यांच्या फिर्यादीनुसार संशयितांनी शुक्रवारी (ता.६) सायंकाळी सव्व सातच्या सुमारास भाजीमार्केट परिसरात धक्का लागल्याची कुरापत काढून मारहाण करीत शस्त्राने वार केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.