जबरीलुटीच्या दोन घटना ; जबरचोरीचा गुन्ह दाखल
नाशिक : शहरात लुटमारीच्या घटना वाढल्या असून, वेगवेगळया भागात नुकत्याच जबरीलुटीच्या दोन घटना घडल्या. औद्योगीक वसाहतीत पादचा-यास लुटण्यात आले तर पांडवनगरी भागात भरदिवसा लुटारूंनी घरात शिरून दांम्पत्यास धारदार चाकूचा धाक दाखवित रोकडसह मोबाईल बळजबरीने हिसकावून नेले. याप्रकरणी सातपूर आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतिष शांताराम जैन (३८ रा.कामगारनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जैन गुरूवारी (दि.५) रात्री परिसरातील सारडा बंगल्याकडून रस्त्याने पायी घराकडे जात असतांना ही घटना घडली. दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांची वाट अडवित दमदाटी केली. यावेळी दुकलीने त्यांना धक्काबुक्की करीत त्याच्या खिशातील सुमारे सहा हजार रूपये किमतीचा मोबाईल बळजबरीने काढून घेत पसार झाले. अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत. दुस-या घटनेत दांम्पत्यास चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. रंजना नितीन आहेर (रा.अभिमन्यू अपा.समोर पांडवनगरी) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. आहेर दांम्पत्य शुक्रवारी (दि.६) दुपारच्या सुमारास आपल्या घरात असतांना अनोळखी तरूणाने घरात प्रवेश केला. यावेळी त्याने आहेर दांम्पत्यास चाकूचा धाक दाखवित दाम्पत्याकडील दोन हजाराची रोकड,दोन मोबाईल असा सुमारे ८ हजाराचा ऐवज हिसकावून घेत पोबारा केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.
…..
मुलगा अडचणीत असल्याचे सांगून मंगळसुत्र लांबविले
नाशिक : मुलाचा मित्र असल्याचे भासवून एकाने महिलेचे मंगळसुत्र लांबविल्याची घटना सिडकोत घडली. मुलगा अडचणीत असल्याचे सांगून मंगळसुत्र लांबविण्यात आले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशिला तुकाराम खाचणे (रा.हॉटेल सायंतारा जवळ,सावतानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खाचणे व त्यांच्या सून शुक्रवारी (दि.६) सकाळच्या सुमारास आपल्या घरकामात व्यस्त असतांना एक इसम घरात आला. यावेळी त्याने आपण तुमच्या मुलाचे मित्र असून तो अडचणीत असल्याचे सांगितले. यावेळी त्याने मुलास पैश्यांची गरज असल्याचे सांगून खाचणे यांचे सुमारे ३० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र आपल्या पदरात पाडून घेत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.
….
संतप्त टोळक्याने अॅम्ब्युलन्सचे केले नुकसान
नाशिक : हाणामारीतील जखमीस वेळेत उपचारार्थ दाखल न केल्याने संतप्त टोळक्याने अॅम्ब्युलन्सचे नुकसान करीत चालकासह त्याच्या मित्रास बेदम मारहाण केल्याची घटना नायगाव रोडवर घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी तीघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे. अनिल सुदाम लांडगे (२४ रा.चिंचोली ता.सिन्नर),निखील रामदास जाधव (२३ रा.मनोदय जीम जवळ,शिंदे पळसे) व सागर गोविंद निरभवणे (२१ रा.पाटाजवळ,शिंदेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी दुर्गेश बाळासाहेब शिंंदे (२७ रा.पांगरी ता.सिन्नर) या अॅम्ब्युलन्स चालकाने तक्रार दाखल केली आहे. शिंदे व प्रफुल्ल राजेंद्र खोले हे दोघे मित्र शुक्रवारी (दि.६) नायगाव रोडने आपल्या अॅम्ब्युलन्समधून एमएच १५ डीके ३३१६ प्रवास करीत असतांना ही घटना घडली. पाटाजवळ संशयीत त्रिकुटाने अॅम्ब्युलन्स अडवित दोघा मित्रांना मारहाण केली. शाहगाव ता.सिन्नर येथील हाणामारीतील जखमी सिराज सैय्यद यास का जिल्हारूग्णालयात दाखल केले. याचा जाब विचारत त्रिकुटाने दोघा मित्रांनी बेदम मारहाण केली. यावेळी निखील जाधव याने अॅम्ब्युलन्सच्या पाठीमागील काचेवर दगड फेकून मारल्याने काच फुटली असून अॅम्ब्युलन्सचे नुकसान झाले आहे. पोलीसांनी तीघा संशयीतांना अटक केली असून अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.