आत्महत्येचे लोण सुरूच; शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या चौघांनी केली आत्महत्या
नाशिक : शहरात आत्महत्येचे लोण सुरूच असून वेगवेगळया भागात राहणा-या चौघांनी शुक्रवारी (दि.४) आत्महत्या केल्या. त्यात १५ वर्षीय मुलासह दोन महिलांचा समावेश आहे. चौघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड,भद्रकाली,पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सिडकोतील गजानन चौकात राहणा-या ओमकार दत्तू आव्हाड या मुलाने शुक्रवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी त्यास तातडीने सुविचार हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. दुसरी घटना जुने नाशिक भागात घडली. भोई गल्लीत राहणा-या भारती अनिल ब्रम्हाणी (४५ रा.सावरकर चौक) या महिलेने शुक्रवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत. पंचवटीतील कृष्णनगर भागात राहणा-या हर्षा कुणाल पटेल (३९ रा.महालक्ष्मी व्हिला) यांनी शुक्रवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून खिडकीच्या ग्रीलला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यांना तातडीने कुटूंबियांनी अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत. तर जेलरोड भागातील आरंभ महाविद्यालय परिसरात राहणा-या सुनिल भास्कर आव्हाड (४९ रा.साने गुरूजीनगर) यांनी शुक्रवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारमातून छताच्या हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक परदेशी करीत आहेत.
………
मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच: वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरीला
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरट्यांनी नुकत्याच चोरून नेल्या. याप्रकरणी मुंबईनाका,भद्रकाली आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धात्रक फाटा भागातील मधूकर दगू गायकवाड गेल्या २८ जुलै रोजी तुपसाखरे लॉन्स भागात कामानिमित्त गेले होते. इंडसन्स बँकेच्या पार्किंगमध्ये त्यांनी आपली डिस्कव्हर दुचाकी एमएच १५ सीक्यू ९९२९ पार्क केली असता चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार खुळात करीत आहेत. दुसरी घटना मेनरोड भागात घडली. गाडगे महाराज पुतळा परिसरात पार्क केलेली एमएच १५ डीजी ५५५६ ही मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गेल्या बुधवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास घडली असून याप्रकरणी विनोद जयराम गाजरे (रा.पंपीग स्टेशन) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत. तर गोरेवाडीतील सोमनाथ चिमनराव जाधव (रा.नाशिककर मळा) यांची शाईन दुचाकी एमएच १५ एफके ३६१३ गेल्या २३ जुलै रोजी त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चिखले करीत आहेत.