वेगवेगळया भागात भरदिवसा तीन घरफोड्या; पावणे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला
नाशिक : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून कुटुंबिय घरात नसल्याची टेहळणी करून चोरटे राजरोसपणे लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारत आहेत. वेगवेगळया भागात भरदिवसा झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. याप्रकरणी मुंबईनाका,इंदिरानगर आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनोहरनगर येथील शितल श्रीपाद कुलकर्णी (रा.सुमंगल हौ.सोसा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कुलकर्णी कुटूंबिय शुक्रवारी (दि.६) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे लॅचलॉक तोडून बेडरूममधील कपाटातील १३ हजार ६०० रूपयांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे,घड्याळ असा सुमारे २ लाख ३७ हजार ३०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक मोहन पाटील करीत आहेत. दुसरी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. याप्रकरणी सायली सुमित भामरे (रा.सिल्व्हर पाम सोसा.ज्ञानेश्वरनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. भामरे कुटुंबिय गुरूवारी (दि.५) दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी बेडरूममधील माळयावर ठेवलेली बॅग काढून तिच्यातील २८ हजाराची रोकड आणि चांदीच्या साखळया असा सुमारे २९ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत. तर उपनगर हद्दीतील महात्मा गांधी सभागृह फोडून १३ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात लोखंडी प्लेटा,केबल वायर आणि ट्यूब लाईटचा समावेश आहे. ही घटना गुरूवारी (दि.५) दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी देवानंद शिंदे (रा.मोह ता.सिन्नर) यांनी तक्रार दाखल केल्याने उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
घरात प्रवेश करून चोरट्यांनी लाखाच्या ऐवजावर डल्ला
नाशिक : भरदिवसा वेगवेगळया भागातील उघड्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. ध्रुवनगर भागातील चोरीत पर्समधील रोकडसह सोन्याची पोत असा ८१ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. तर उपनगरनाका भागात घरात शिरलेल्या चोरट्यांनी दोन मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी गंगापूर आणि उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिषा धनंजय थेटे (रा.साई मंदिराजवळ,ध्रुवनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. थेटे या मंगळवारी (दि.३) सकाळच्या सुमारास घरकामात व्यस्त असतांना ही घटना घडली. घराचे दार उघडे असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. हॉलमधील लोखंडी कपाटाला टांगलेल्या पर्स मधील १ हजार ६०० रूपयांची रोकड आणि सोन्याची पोत असा सुमारे ८१ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार भडांगे करीत आहेत. दुसरी घटना उपनगर नाका भागात घडली. याप्रकरणी लारो मोहम्मद अलाउद्दीन खासून (५२ रा.महारूद्रा अपा.) यांनी तक्रार दाखल केली आहे. खातून कुटूंबिय बुधवारी (दि.४) आपआपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश केला. यावेळी भामट्यांनी हॉल मध्ये ठेवलेला सुमारे २० हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
….