हद्दपार केलेले असतांना शहरात वावरणा-या तडीपारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक : शहर आणि जिह्यातून हद्दपार केलेले असतांना शहरात वावरणा-या तडीपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई मखमलाबाद येथील विद्यानगर भागात करण्यात आली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बाळासाहेब फड (२९ रा.राहूल चौक,विद्यानगर) असे अटक केलेल्या तडिपाराचे नाव आहे. प्रशांत फड याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास पोलीसांनी शहर व जिह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यामुळे गुरूवारी (दि.५) म्हसरूळ पोलीसांनी त्याच्या घरपरिसरात सापळा लावला असता तो जाळ््यात अडकला. याप्रकरणी शिपाई दिनेश गुंबाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेवरे करीत आहेत.
कारची काच फोडून चोरट्यांनी केला लॅपटॉप लंपास
नाशिक : पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेला. ही घटना नाशिक पुणा मार्गावरील पासपोर्ट ऑफिस परिसरात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. राजेश किशनलाल बंगाली (रा.आडकेनगर,दे.कॅम्प) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बंगाली गुरूवारी (दि.५) पासपोर्ट ऑफिस परिसरात कामानिमित्त आले होते. नाशिक पुणे रोडवरील पतंजली स्टोअर्स समोर त्यांनी आपली एमएच १५ जीएल ५२३५ कार पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारची पाठीमागील दरवाजाची काच फोडून लॅपटॉपसह बॅग चोरून नेली. बॅगमध्ये ब्ल्युट्यूब चार्जर तसेच महत्वाचे कागदपत्र असा सुमारे २५ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार काझी करीत आहेत.