शहरात दोन ठिकाणी घरफोडी ; चोरट्यांनी कारही पळवून नेली
नाशिक : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे एक लाखाहून अधिक किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यातील एका घरफोडीत चोरट्यांनी कारही पळवून नेली होती. मात्र ती निर्जनस्थळी मिळून आली असून याप्रकरणी उपनगर आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डीजीपीनगर क्र.१ मधील वाराही नगर भागात राहणा-या रोहिनी रविंद्र काळे (रा.के.के.ओमकार सोसा.) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,काळे कुटूंबिय मंगळवारी सायंकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले सुमारे ८४ हजार ७०० रूपये किमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. दुसरी घटना देवळाली कॅम्प येथील विजयनगर भागात घडली. योगेश अशोक बाविस्कर (रा.हनुमाननगर,पाथर्डी फाटा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बाविस्कर यांचे विजयनगर भागातील एचएएल सोसायटीत योगीराज नावाचा बंगला आहे. बुधवारी (दि.४) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद बंगल्याच्या मागील दरवाजाची जाळी कापून घरात प्रवेश केला व सीसीटिव्ही कॅमे-याचे नुकसान करीत देव्हा-यातील सुमारे २२ हजाराचे चांदीचे व पितळी देव चोरून नेले. विशेष म्हणजे या घरफोडीनंतर चोरट्यांनी बंगल्याच्या आवारात पार्क केलेली एमएच १५ इएक्स २३६४ ही कारही पळवून नेली होती. पोलीस तपासात ती निर्जन स्थळी मिळून आली असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार मडके करीत आहेत.
वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी गळफास लावून घेत केली आत्महत्या
नाशिक : शहरात आत्महत्येची मालिका सुरू असून वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी गुरूवारी (दि.५) गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यात एका ७० वर्षीय वृध्द महिलेसह युवकाचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड आणि अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. जेलरोड येथील कॅनोल रोड भागात राहणा-या अनुसया काशिनाथ हिवाळे (७० रा.साईनाथनगर,सोनवणे मळा) या वृध्देने गुरूवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून लोखंडी अॅगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी विशाल पगारे यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत. दुसरी घटना सिडकोतील कामठवाडा भागात घडली. विजय प्रकाश महाजन (२७ रा.निखील पार्क बिल्डींग नं. ४) या युवकाने गुरूवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याबाबत विजय महाजन यांनी खबर दिल्याने अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.