नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर बलात्कार करणा-या संशयीतास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. महिलेने लग्नाचा तगादा लावल्याने तो गेल्या सात ते आठ महिन्यांपासून पसार झाला होता. मात्र शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने त्यास हुडकून काढले. संशयीतास नाशिकरोड पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. प्रशांत मिलींद भालेराव (२५ रा. अरिंगळे मळा,एकलहरारोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. संशयीत आणि तक्रारदार महिला एकमेकांचे शेजारी आहेत. कोरोना महामारीमुळे मुंबईस्थीत ३० वर्षीय विधवा महिला आपल्या मुलांना सासरी घेवून आलेली आहे. सासूच्या माध्यमातून गेल्या वर्षी मे महिन्यात दोघांची ओळख झाली. अविवाहीत असून लग्न करून मुलांना आपले नाव लावेल असे आश्वासन देवून संशयीताने हे कृत्य केले. मे ते नोव्हेंबर २०२० या दरम्यान संशयीताने महिलेच्या घरी जावून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. अचानक तो पसार झाल्याने पीडितेने शोध घेतला असता त्याने प्रेमविवाह केल्याचे कळले. त्यामुळे पीडितेने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस संशयीताच्या मागावर असतांनाच युनिट २ चे सहाय्यक उपनिरीक्षक शामराव भोसले यांना मिळालेल्या माहितीवरून संशयीतास बेड्या ठोकण्यात आल्या. संशयीत नाशिकरोड भागात आल्याची माहिती मिळताच पोलीसांनी सापळा लावून त्यास जेरबंद केले. ही कारवाई उपायुक्त संजय बारकुंड,सहाय्यक आयुक्त नवलनाथ तांबे,युनिटचे निरीक्षक अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक शामराव भोसले,हवालदार बाळू शेळके, शंकर काळे शिपाई संतोष माळोदे आदींच्या पथकाने केली.