कोरोनानियमांचे उल्लंघन; चर्चच्या फादर विरोधात गुन्हा दाखल
नाशिक : कोरोना महामारीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील एका चर्चच्या फादर विरोधात पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून जमावबंदीच्या आदेश लागू असतांना गर्दी जमविल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. प्रविण घुले असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चर्चच्या फादरचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना महामारीमुळे शहरात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. जमाव बंदी आदेश लागू असतांना फादर घुले यांनी शरणपूर रोडवरील संत आंद्रिया चर्च मध्ये विना परवानगी लोकांची गर्दी जमवून कार्यक्रम घेतला. याप्रकरणी पोलीस नाईक अनिल गुंबाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार लांडे करीत आहेत.
…
१७ वर्षीय युवतीची आत्महत्या
नाशिक : वडनेररोडवरील विहीतगाव सिग्नल भागात राहणा-या १७ वर्षीय युवतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. साक्षी संजय धोंगडे (१७) असे आत्महत्या करणा-या तरूणीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षी धोंगडे हिने मंगळवारी (दि.३) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.