चोरट्यांनी एकाच सोसायटीतील चार घरे फोडली; ९५ हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक : वडाळा शिवारातील खोडेनगर भागात धुमाकूळ घालत चोरट्यांनी एकाच सोसायटीतील चार घरे फोडली. या घरफोडीत रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे लाखाच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात एकत्रीत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक बाळासाहेब पवार (रा.हरिस्नेह सोसा.खोडेनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खोडेनगर भागात हरिस्नेह नावाची दोन विंगची बहुमजली सोसायटी आहे. या सोसायटीतील चार कुटूंबिय बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (दि.२) मध्यरात्री कुटूंबिय घरात नसल्याची संधी साधत ए वींग मधील ३०१ व ३०२ तर बी विंग मधील २०१ व २०२ ही चार घरे फोडली. बंद घराचे लॅच लॉक तोडून चारही घरातील रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला असून, पवार यांच्या तक्रारीवरून ९५ हजाराचा ऐवज चोरीस गेला आहे. अधिक तपास पाटील करीत आहेत.
काकडी उचलून खाल्याने भाजीपाला विक्रेत्याने बालकासह पित्यास केली मारहाण
नाशिक- विक्रीसाठी ठेवलेली काकडी उचलून खाल्याने संतप्त भाजीपाला विक्रेता असलेल्या बापलेकाने तीन वर्षीय बालकासह त्याच्या पित्यास बेदम मारहाण केल्याची घटना क्रांतीनगर भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. संदिप भिकाजी आहेर (रा.क्रांतीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. आहेर रविवारी (दि.१) रात्री मुलगा साई (वय ३) यास सोबत घेवून भाजीपाला खरेदी करण्यासाठी परिसरातील पिरबाबा मंदिराजवळ भरणा-या भाजीबाजारात गेले होते. भाजीपाला खरेदी करीत असतांना मुलगा साई याने ऋषीकेश नामक भाजीविक्रेत्याच्या दुकानातील काकडी उचलून घेवून खाल्ली. यामुळे संतप्त झालेल्या ऋषीकेश व त्याच्या वडिलांनी तीन वर्षीय बालकास हाताच्या चापटीने मारहाण केली. याप्रसंगी आहेर मुलास मारू नका असे सांगत असतांना संशयीतांनी त्यांच्याडोक्यात लोखंडी रॉड मारून दुखापत केली. अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.
….