पैश्यांचे आमिष दाखवून आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
नाशिक : पैश्यांचे आमिष दाखवून आठ वर्षीय चिमुकलीवर अज्ञात मुलाने बलात्कार केल्याची घटना आडगाव शिवारात घडली. कामावरून घरी परतलेल्या पालकांकडे मुलीने आपबिती कथन केल्याने हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जत्रा नांदूर लिंकरोड भागातील बंद असलेल्या एका बांधकाम साईटवरील वॉचमन रूम मध्ये पीडितेचे कुटुंबिय राहतात. मंगळवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास पीडितेचे आई वडिल नजीकच्या एका धाब्यावर कामानिमित्त गेले असता ही घटना घडली. अंगणात खेळणा-या चिमुरडीस एका १४ ते १५ वर्षीय अनोळखी अल्पवयीन मुलाने पैश्यांचे आमिष दाखवून हे कृत्य केले. आई वडिलांची चौकशी करीत त्याने मुलीच्या हातात चिल्लर ठेवत तिला घरात नेऊन बलात्कार केला. अधिक तपास उपनिरीक्षक चांदणी पाटील करीत आहेत.
पाय घसरून पडल्याने ५५ वर्षीय कामगाराचा मृत्यु
नाशिक : ऑफिसमध्ये नियमीत साफसफाई करीत असतांना पाय घसरून पडल्याने ५५ वर्षीय कामगाराचा मृत्यु झाला. ही घटना शरणपूररोड भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. वसंत बाळासाहेब थेटे (रा.सौभाग्य नगर,पंपीग स्टेशन) असे मृत कामगाराचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार थेटे शरणपूररोड भागातील राठी बिल्डर्स या कार्यालयात नोकरीस होते. कार्यालयातील नियमीत साफसफाई करीत असतांना ते पाय घसरून पडले होते. या घटनेत त्यांच्या पायांना आणि छातीला दुखापत झाल्याने तात्काळ जयराम हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता मंगळवारी (दि.३) उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार लांडे करीत आहेत.