नाशिक : कार अडवून पतीस मारहाण करीत पत्नीचे दागिणे ओरबाडणा-या त्रिकुटास पोलीसांनी जेरबंद केले. ही घटना पंचवटीतील गणेशवाडी भागात घडली होती. संशयीतांचे साथीदार अद्याप फरार असून या घटनेनंतर संशयीतांच्या टोळक्याने याच भागात एकावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता.विक्की किशोर बजाज (२४ रा.शेरे मळा,सहजीवन नगर),अजय चंदर कुंदे (१९) व अजय अनिल भोईर (२१ र.मुंजोबा चौक,गणेशवाडी) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. भद्रकालीतील नदीन निसार खान (३०, भोईगल्ली) यांनी याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. खान दांम्पत्य रविवारी (दि.१) गणेश वाडीतील साई बाबा मंदिर परिसरातून आपल्या फोर्ड फिगो (एमएच १५ सीटी ९०९१) या कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. अचानक समोर आलेल्या टोळक्याने दांम्पत्याची कार अडवित गाडीच्या काचेवर बुक्के मारुन काचेचे नुकसान केले. यानंतर नदीन खान यांना मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील दिड तोळ्याची सोन्याची चैन तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे तीस हजार रुपयांची सोन्याची पोत ओबरडून नेली होती. तर दुस-या घटनेत संबधीतांवर एकाने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. भरदिवसा घडलेल्या घटनेची पोलीस आयुक्तांनी दखल घेतल्याने पंचवटी पोलीस कामाला लागले होते. पोलीसांनी तिघा संशयीतांना अटक केली असून त्यांचे साथीदार अद्याप फरार आहेत. ही कारवाई पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत,निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार,पोलीस नाईक सागर कुलकर्णी,शिपाई विलास चारोस्कर,कुणाल पचलोरे,नितीन जगताप,राजेश राठोड,कल्पेश जाधव,अंबादास केदार,घनश्याम महाले आदींच्या पथकाने केली.