मदतीचा बहाणा ; भामट्यांनी वृध्दाच्या हातातील ५०० च्या ४२ नोटा केल्या लंपास
नाशिक : बँकेत भरणा करीत असतांना मदतीचा बहाणा करीत भामट्यांनी वृध्दाच्या हातातील ५०० च्या ४२ नोटा हातोहात लांबविल्याची घटना शरणपूररोड भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू भगवानसा धनवंत (७३ रा.सातपूर अंबड लिंकरोड,खुटवडनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. धनवंत हे २६ जुलै रोजी दुपारच्या सुमारास बँक आॅफ बडोदाच्या शरणपूररोड शाखेत भरणासाठी गेले होते. पन्नास हजार रूपये भरणा करण्यासाठी ते स्लिप भरून बंडल मधील नोटांची मोजणी करीत असतांना ही घटना घडली. बँकेत अज्ञात दोघा भामट्यांनी त्यांना गाठले यावेळी त्यांनी मदतीचा बहाणा करून बंडलमधील २१ हजाराची रोकड हातोहात लांबविली. ही बाब कॅशिअरने पैसे मोजल्यानंतर समोर आली असून, बंडलमध्ये १०० पैकी ५८ नोटा होत्या. ४२ नोटा भामट्यांनी गायब केल्याने धनवंत यांनी पोलीस ठाणे गाठले असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
……….
गणेशवाडीत कोयताधारी जेरबंद
नाशिक : धारदार कोयता बाळगणा-या एकास पोलीसांनी जेरबंद केले. सशयीत परिसरात दहशत माजविण्यासाठी कोयता घेवून फिरत होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव दिगंबर जाधव (२० रा.काजी गढी,जुना कुंभारवाडा) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. गणेशवाडीतील शेरे मळा भागात सोमवारी (दि.२) रात्री एक तरूण हातात धारदार कोयता घेवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पंचवटी पोलीसांनी धाव घेत संशयीतास सुलभ शौचालय परिसरात बेड्या ठोकल्या असून त्याच्या ताब्यातून कोयता हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई नितीन जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.
….
दुचाकीस्वार महिलेची पोत खेचली
नाशिक : पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीस्वार भामट्याने महिलेच्या गळयातील मंगळसुत्र ओरबाडून नेल्याची घटना गंगापूररोडवरील सिरीन मिडोज भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती संदिप पाटील (रा.सिरीन मिडोज) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील सोमवारी (दि.२) मुलास कटींग करण्यासाठी परिसरातील सलून दुकानात जात असतांना ही घटना घडली. पाटील मायलेक रस्त्याने पायी जात असतांना घरापासून काही अंतरावरच स्प्लेंडर दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांना स्वरा हाईटस किधर है असा पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या गळयातील सुमारे ७० हजार रूपये किमतीचे दुपदरी मंगळसुत्र ओरबाडून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
……
दोन मोटारसायकली चोरी
नाशिक : शहर परिसरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी देवळाली कॅम्प आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नानेगाव ता.जि.नाशिक येथील योगेश मनोहर मोरे यांची ड्रिमयुगा एमएच १५ जीजे ७३१८ मोटारसायकल दि.८ जुलै रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक जगदाळे करीत आहेत. दुसरी घटना नाशिकरोड येथील उड्डाणपुल भागात घडली. मोटवाणीरोड भागात राहणारे सुर्यभान केरू कडभाने ३० जुलै रोजी नाशिकरोड भागात गेले होते. सिन्नर कडून बिटकोकडे जाणा-या नाशिकरोड येथील उड्डाणपुलाच्या अरिंगळे मळा भागात जाणा-या पाय-यांजवळ आपली पॅशन एमएच १५ ए वाय १३७९ दुचाकी पार्क केली असता चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.
..
..