गंगावाडीत तरूणावर प्राणघातक हल्ला; तरुणाची प्रकृर्ती गंभीर
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या तरूणावर टोळक्याने धारदार कोयत्याने वार करीत प्राणघातक हल्ला केल्याची घटना गंगावाडीत घडली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात असून, जखमी तरूणावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम मधुकर खैरनार (१९ रा.क्रांतीनगर,मखमलाबाद रोड) असे टोळक्याच्या हल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. शुभम खैरनार हा रविवारी (दि.१) रात्री गंगावाडीत राहणा-या आपल्या मानलेल्या बहिणीस भेटण्यासाठी गेला होता. बहिणीस भेटून तो आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. लहान महादेव मंदिरासमोर बसलेल्या सिध्देश मुर्तडक,गणेश कांडेकर व त्यांच्या साथीदारांनी त्यास अडवित जुन्या वादाची कुरापत काढून हा हल्ला केला. या घटनेत शुभमच्या डोक्यावर,कानामागे, मानेवर,दंडावर आणि हाताच्या पंज्यावर धारदार कोयत्याने वार करण्यात आले असून, त्याची प्रकृर्ती गंभीर आहे. जखमीवर रूग्णालयात उपचार सुरू असून त्याचे वडिल मधुकर खैरनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून टोळक्याविरूध्द जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.
……
मेरी कॉलनीत घरफोडी
नाशिक : घरात कुटुंबिय नसल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घर फोडून रोकडसह दागिणे चोरून नेले. ही घटना मेरी कॉलनीत घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीव बशीर तडवी (रा.बिल्डींग नं.डी २,मेरी कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तडवी कुटूंबिय २० जुलै ते १ ऑगष्ट दरम्यान बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून शोकेस मधील पाच हजाराची रोकड आणि सोन्याचे दागिणे असा सुमारे १५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिरी करीत आहेत.
……..
रिक्षाप्रवासात वृध्देची पोत लांबविली
नाशिक : रिक्षाप्रवासात सहप्रवासी असलेल्या भामट्या महिलांनी वृध्देच्या पर्समधून सोन्याची पोत हातोहात लांबविल्याची घटना शालिमार ते जीपीओ रोड भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यमुना रमेश जगझाप (६० रा.प्रगतीनगर,कामटवाडा रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जगझाप या सोमवारी (दि.२) दुपारच्या सुमारास सराफ बाजारातील गुळवंचकर या दुकानात आल्या होत्या. जुन्या पोतीत वाढ करून त्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. जुन्या पोतीत भर टाकून त्या शालिमार येथून रिक्षाप्रवास करीत असतांना सहप्रवासी असलेल्या भामट्या अनोळखी महिलांपैकी एकीने पर्सची चैन उघडून सोन्याची पोत असलेली डबी चोरून नेली. या डबी मध्ये सुमारे ४४ हजार रूपये किमीतीची पोत होती. अधिक तपास पोलीस नाईक गवारे करीत आहेत.