आधी भररस्त्यात लूटमार
नाशिक – पंचवटीतील गणेशवाडीत काल दोघा सराईतांसह चौघांनी सायंकाळी गोंधळ घातला. आधी रस्त्यात चार चाकी अडवून सोन्याचे दागिणे ओरबडले त्यानंतर काही वेळाने सहजीवन भागात खुन्नसने का बघतो म्हणत एकावर चाकूचे वार केले. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विकी बजाज अजय भोई, अजय म्हाताऱ्या गुडु फसाळे अशी संशयितांची नावे आहे. या संशयितांनी काल रविवारी (ता.१) सायंकाळी सहाला गणेशवाडीतील साईबाबा मंदीर परिसरात चारचाकी गाडी अडवून चालकाच्या व त्याच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे ओरबडून नेण्याचा प्रकार उघडकीस आला. नदीन निसार खान (वय ३०, भोईगल्ली भद्रकाली) हे त्यांच्या फोर्ड फिगो (एमएच १५ सीटी ९०९१) हिच्यातून जात असतांना संशयितांनी त्यांची गाडी अडविली. गाडीच्या काचेवर बुक्के मारुन काचेचे नुकसान केले. त्यानंतर नदीन खान यांच्या गळ्यातील दिड तोळ्याची सोन्याची चेन तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे तीस हजार रुपयांची सोन्याची पोत ओरबडून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक कासर्ले तपास करीत आहेत.
खुन्नसने पाहिले म्हणून चाकूचे वार
त्यानंतर काही वेळातच पंचवटीतील गणेशनगर भागात काल खुन्नसने का पाहतो असे म्हणत चौघांनी एकाला बेदम मारहाण करीत चाकुचे वार केले. रविवारी (ता.१) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास विकी बजाज, अजय भोई, अजय म्हाताऱ्या गुड्डू फसाळे या चौघांनी सहजीवन नगर भागात गणेश शरद पवार (वय २०) व प्रणव देवरे हे दोघे शौचालयातून बाहेर येत असतांना या दोघांना गाठून तुम्ही दुपारी दोनला माझ्याकडे खुन्नसने का पाहिले. असे म्हणत, तुझा भाऊ कार्तीक पवार याने पण माझ्याशी भांडण केले आहे. असे म्हणत विकी बजाज याने वाद शिवीगाळ केली. तसेच कमरेचा चाकू काढून त्याच्यावर वार केले. अजय म्हाताऱ्या याने पाठीत दगड घातला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.