कारची काच फोडून लॅपटॉप चोरी
नाशिक : रस्त्यावर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेल्याची घटना राका कॉलनीत घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकित त्रिभुवनलाल काल्या (रा.सरगम अपा.राका कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अंकित काल्या यांनी बुधवारी (दि.२८) रात्री आपल्या सोसायटीसमोर कार पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून २५ हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक घोरपडे करीत आहेत.
बोकडाच्या पैश्यातून एकास मारहाण
नाशिक : रमजान ईद पूर्वी खरेदी केलेल्या बोकडाच्या पैश्याच्या कारणातून एकास तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना अंबड गावात घडली. या घटनेत तक्रारदार जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोलू उर्फ समशेर शेख,फिरोज शेख व मुक्तार काचवालाचा मुलगा अशी मारहाण करणाºया संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी शब्बीर मुन्ना कुरेशी (३८ रा.संजिवनगर,अंबड सातपूर लिंकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुरेशी यांनी रमजान ईद पूर्वी समशेर शेख याच्याकडून बोकड खरेदी केले होते. यावेळी पैश्यांच्या वादातून दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली होती. या घटनेत तीन महिने झालेले असतांना गेल्या सोमवारी (दि.२६) संशयीतांनी महाराष्ट्र वजन काट्याजवळ कुरेशी यांना गाठून बेदम मारहाण केली. जुन्या वादातून झालेल्या या मारहाणीत लाकडी दांडा व स्टीलच्या पाईपाचा वापर करण्यात आल्याने कुरेशी जखमी झाले असून अधिक तपास हवालदार भड करीत आहेत.
चार दुचाकी चोरीला
नाशिक : शहरात वाहनचोरीची मालिका सुरू असून वेगवेगळ््या भागातून चार मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी मुंबईनाका,म्हसरूळ आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशोकामार्ग परिसरातील इश्वर पदमाकर पाटील (रा.कल्पतरूनगर) यांची यामाहा एमएच १५ एसी १५०८ मोटारसायकल गेल्या मंगळवारी (दि.२०) रात्री द्वारका परिसरातील हरिहर सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक जावेद शेख करीत आहेत. दुसरी घटना म्हसरूळ भागातील वरवंडी रोड परिसरात घडली. विकास दिलीप सुर्यवंशी (रा.सुर्यवंशी मळा) यांची स्प्लेंडर एमएच १५ बीई ८०३६ गेल्या शुक्रवारी (दि.२) त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार पवार करीत आहेत. लक्ष्मण नारायण साळवे (रा.सुभाषरोड) यांची एमएच १५ बीजे ३३६२ दुचाकी गेल्या रविवारी (दि.२५) सुभाषरोडवरील बबलू भंगार दुकानासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. तर जयभवानी रोड भागातील विष्णू गणपतराव नागुलकर (रा.आडकेनगर) हे बुधवारी (दि.२८) नाशिकरोड बसस्थानक भागात गेले होते. बस स्टॅण्ड आवारात त्यांनी आपली एमएच १५ एपी १८५२ दुचाकी पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. दोन्ही घटनांप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत.