दुस-या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यु
नाशिक : घराच्या दुस-या मजल्यावर सेंट्रींग काम करीत असतांना तोल जावून पडल्याने कामगाराचा मृत्यु झाला. ही घटना शिलापूर गावात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सागर चंद्रकांत मांडवे (४० रा.वेताळबाबानगर,माडसांगवी) असे इमारतीवरून पडल्याने मृत्यु झालेल्या कामगाराचे नाव आहे. मांडवे शिलापूर गावातील मारूती मंदिराच्या पाठीमागे राहणा-या हिराबाई पवार यांच्या घरात सेंट्रींग काम करीत असतांना ही घटना घडली. दुस-या मजल्यावर काम करीत असतांना अचानक तोल गेल्याने मांडवे जमिनीवर कोसळला होता. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.
रिक्षाचालकास मारहाण दोघांना अटक
नाशिक : रिक्षातील सामानास हात लावतांना टोकल्याने दोघांनी रिक्षाचालकास बेदम मारहाण केल्याची घटना सिध्दार्थनगर भागात घडली. या घटनेत चालकास रस्त्यावर आपटल्याने तो जखमी झाला असून पोलीसांनी दोघा संशयीतास अटक केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद दत्तू शिंदे व भारत भास्कर गायकवाड (रा. दोघे बुध्दविहारमागे,सिध्दार्थ नगर) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी महेश आनंदा तिजारे (४९ रा.डी.के.नगर) या रिक्षाचालकाने तक्रार दाखल केली आहे. तिजारे गुरूवारी (दि.२९) सायंकाळी एमएच १५ झेड २९३१ या रिक्षातून हार्डवेअर वस्तू पोहचविण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. बॉईज टाऊन स्कूल समोरील पान दुकानासमोर त्यांनी आपली रिक्षा पार्क करून ते दुकानात गेले असता रिक्षाजवळ पोहचलेल्या दोघांनी सामानाची उस्तापास्तर केली. यावेळी तिजारे यांनी रिक्षातील वस्तूंना हात लावू नका असे सांगितल्याने संतप्त दोघांनी शिवीगाळ करीत त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत संशयीतांनी तिजारे यांना रस्त्यावर लोटून दिल्याने त्यांच्या डोक्यास दुखापत झाली असून अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.