अल्पवयीन मुलीचा विनयभंग दोघांना अटक
नाशिक : कुटूंबियांस जीवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने मोबाईलवर फोटो काढून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना द्वारका भागातील महालक्ष्मी चाळीत घडली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष राजेंद्र चावरिया (२१) व भावेश कैलास पवार (२०) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे. महालक्ष्मी चाळ भागात राहणा-या अल्पवयीन मुलीस भावेश पवार या युवकाने आपल्या घरी बोलावून हे कृत्य केले. कुटूंबियास ठार मारण्याची धमकी देत आशिष चावरिया याच्यासमवेत मुलीस फोटो काढण्यास भाग पाडले. त्यानंतर मुलगी परिसरातील मैदानावरील सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेली असता चावरिया याने तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.
कारच्या काचा फोडून म्युझिक सिस्टीमची चोरी
नाशिक : पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून महागडे म्युझिक सिस्टीमवर चोरटे डल्ला मारत आहेत. महात्मानगर भागातील वेगवेगळय़ा ठिकाणी दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी म्युझिक सिस्टीम आणि जॅकेट असा सुमारे ३१ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा नगर येथील क्रिकेट ग्राऊंड भागात राहणारे गौरव महेश ठाकूर (रा.इडन गार्डन) यांची क्रेटा कार एमएच १५ जीआर १८३८ बुधवारी (दि.२८) रात्री त्यांच्या घरासमोरील ग्राऊंड जवळ नेहमी प्रमाणे रस्त्याच्या कडेला पार्क केलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी खिडकीची काच फोडून कारमधील टचस्क्रीन म्युझिक सिस्टीम आणि जॅकेट चोरून नेले. दुसरी घटना याच भागातील सह्याद्री अपार्टमेंट समोरील घडली. अनिकेत अनिल पाटील यांच्या मालकीची आय २० एमएच ४१ एझेड ८००८ याच रात्री घरासमोरील रस्त्याच्या कडेला पार्क केलेली असतांना चोरट्यांनी खिडकीची काच फोडून म्युझिक सिस्टीम चोरून नेली. दोन्ही प्रकार एकाच भागात घडले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारकांकडून होवू लागली आहे. अधिक तपास पोलीस नाईक पगार करीत आहेत.
भरदिवसा एकाच सोसायटीत दोन घरफोड्या : ८५ हजाराची ऐवज लंपास
नाशिक : भरदिवसा एकाच सोसायटीतील दोन घर फोडून चोरट्यांनी सुमारे ८५ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. ही घटना सारडा सर्कल भागातील मदिनाचौकात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्तीयाज अकिल अत्तार (रा.सिल्वर टेल अपा.मदिनाचौक) यांनी तक्रार दाखल केली आहे. सिल्वर टेल सोसायटीतील अत्तार कुटूंबिय आणि शेजारी इम्रान शब्बीर शेख यांचे कुटूंबिय बुधवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी अत्तार आणि शेख यांच्या घरांचा कडीकोयंडा तोडून अत्तार यांच्या बेडरूममधील कपाटातून २५ हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३२ हजाराचा ऐवज तर शेख यांच्या घरातून २२ हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा ५२ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक जावेद शेख करीत आहेत.