कामगाराकडून सुपरवायझरला मारहाण
नाशिक : कामाच्या वेळेत बदल केल्याने संतप्त रूग्णालयीन कामगाराने सुपरवायझरला बेदम मारहाण केल्याची घटना समर्थ नगर भागात घडली. याघटनेत कामगाराने हातातील कड्याने मारहाण केल्याने सुपरवायझर जखमी झाला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार राजेंद्र सावंत (रा.वृंदावननगर) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी आकाश गोविंद राठोड (रा.इच्छामणीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार तक्रारदार आणि संशयीत महात्मानगर येथील सिक्स सिग्मा या खासगी रूग्णालयातील कर्मचारी असून दोघेही आडगाव शिवारात राहतात. राठोड रूग्णालयात सुपरवायझर पदावर कार्यरत असल्याने त्यांच्यावर रूग्णालयातील कर्मचा-यांच्या उपस्थितीची जबाबदार आहे. दैनंदिन नियोजनात राठोड यांनी बदल करून संशायीताच्या कामाच्या वेळेत बदल केल्याने ही घटना घडली. रविवारी (दि.२) सायंकाळी राठोड समर्थ नगर येथील किराणा दुकानासमोरून जात
असतांना संशायीताने त्यांना गाठले. यावेळी त्याने कामाच्या वेळेबाबत जाब विचारत वाद घातला. तसेच शिवीगाळ करीत राठोड यांना हातातील स्टिलच्या कड्याने मारहाण केली. या घटनेत राठोड जखंमी झाले असून अधिक तपास जमादार अरूण पाटील करीत आहेत.
…….
ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नाशिक : भरधाव टॅÑक्टरने धडक दिल्याने ४० वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात चाडेगाव शिवारात झाला. या घटनेत ट्रॅकरच्या टॉलीत बसलेला कामगारही जखमी झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार वाल्मिक नवले (४० रा.आवारे मळा सामनगाव रोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून, या अपघातात बाळू गोरख साबळे (रा.पिंपळस रामाचे ता.निफाड) हा कामगार जखमी झाला आहे. याप्रकरणी मृताचा भाऊ योगेश नवले यांनी तक्रार दाखल केली आाहे. तुषार वाल्मिक हे रविवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास चाडेगाव शिवारातील मानकर वस्ती भागातून एमएच १५ डी डब्ल्यू ८४८३ या आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव येणा-या ट्रॅक्टरने (एमएच १५ एचसी ५३७३) दुचाकीस धडक दिली. धडक इतकी भयंकर होती की,दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसलेला कामगार पडल्याने जखमी झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक माधव पोपट मतसागर (रा.पिंपळस रामाचे ता.निफाड) पसार झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.
……