नाशिक – सोनसाखळी लंपास करणार्या दोन चोरट्यांना नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून १२७ ग्रॅम सोने, दुचाकी, दोन मोबाईल जप्त केले आहेत. चोरट्यांनी पंचवटी, गंगापूर, इंदिरानगर, म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीतील सहा सोनसाखळीचे गुन्हे व मुंबई नाका पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली. चौकशीत त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. प्रकाश ऊर्फ तिरी कुमावत व पंकज आहेर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी वाहन चोरटे, सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळ्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी गुन्हेगारांची माहिती काढून गुन्हे तपास सुरु केला. २३ जुलै रोजी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारदार महिला रस्त्याने पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्या आधारे संशयित आरोपींचा शोध सुरु केला. दरम्यान, पोलीस हवालदार सचिन आजबे यांना सोनसाखळी चोरट्यांचे माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रकाश कुमावत व पंकज आहेर यांना अटक केली. न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली.