भाडेकरुच्या डोक्यात बाटली फोडली
नाशिक – देवळाली कॅम्पला हाडोळा परिसरात भाडेकरुला चौघांनी लाथाबुक्यांनी मारहाण करुन डोक्यात बाटली फोडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परेश ज्ञानेश्वर मोरे (वय ३०, आंबेडकर सोसायटी हाडोळा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात प्रवण बागूल, निखील आगळेकर, प्रतीक गायकवाड, कुणाल आगळेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व संशयित हे देवळाली कॅम्पला हाडोळा भागातील आंबेडकर सोसायटीत थोरात यांच्या घरात रहायला आहे. काल बुधवारी (ता.२८) सायंकाळी सहाला आनंद रोड वरील डॉ. आंबेडकर हॉलजवळ त्यांची गाठभेट झाली. यावेळी चौघा संशयितांनी तुम्ही भाडेकरु आहात तुमचा येथे राहण्याचा काय संबध अशी विचारणा करुन प्रवण बागूल याने डोक्यात बाटली फोडली. त्यानंतर इतर तिघांनी लाथाबुक्यांनी मारहाण करीत, कोयत्याने कापून टाकण्याची धमकी दिली.
शहरातून दोन दुचाकी चोरीला
नाशिक – नाशिकरोडला महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील आतील पार्किंगमध्ये दुचाकी चोरीला गेली. या चोरी प्रकरणी सुनिता राजेंद्र जाधव (वय ३७, माळीवाडा, भैरवनाथ मंदीराजवळ, देवळालीगाव) यांनी तक्रार दिली आहे. नाशिक रोड पोलिस ठाण्यात या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत मंगळवारी दुपारी बाराला पाथर्डी फाटा परिसरातील वासननगर येथील गजसिध्दी अपार्टमेंट येथे बजाज प्लॅटिना चोरीला गेली आहे. दीपक संजय शिंदे (वय ३२, गजसिध्दी वासनगर ) यांनी तक्रार दाखल केली आहे. ही दुचाकी इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेली असता चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली.