वनवैभव कॉलनीत चैनस्नॅचिंग
नाशिक : भाजीपाला खरेदी करून घराकडे परतणा-या महिलेच्या गळयातील दोन सोन्याच्या पोती दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना वडाळा पाथर्डी मार्गावरील वनवैभव कॉलनीत घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनंदा रघूनाथ सानप (रा.गजानन महाराज मंदिरा मागे,वनवैभव कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सानप मंगळवारी (दि.२७) परिसरातील गार्डनच्या समोर बसणा-या भाजीबाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करून त्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. महापालिका गार्डन समोरून त्या पायी येत असतांना समोरून आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे ९८ हजार रूपये किमतीच्या दोन सोन्याच्या पोती ओरबाडून नेल्या. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
दुचाकी घसरल्याने एक ठार
नाशिक : भरधाव दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात भगूर लहवित मार्गावर झाला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. रामदास जगन्नाथ कदम (५७ रा.एमईएस सोसा.विजयनगर,देवळाली कॅम्प) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. कदम मंगळवारी (दि.२७) भगूर लहवित मार्गावरून आपल्या दुचाकीने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. भरधाव दुचाकी घसरल्याने कदम गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी नजीकच्या जयराम हॉस्पिटल येथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ मुंबईनाका भागातील सोपान हॉस्पिटल येथे हलविले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास पोलीस नाईक वारघडे करीत आहेत.