नाशिक : शेती कामावरून रागावल्याने संतप्त मुलाने आपल्या वृध्द पित्याच्या डोक्यात कु-हाड मारून निर्घृण खून केल्याची घटना गिरणारे नजीकच्या धोंडेगाव शिवारात घडली. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी मुलास अटक केली आहे. हरिश्चंद्र नामदेव बेंडकुळे असे अटक करण्यात आलेल्या संशयीत मुलाचे नाव आहे. धोंडेगाव शिवारातील इंदिरानगर वस्तीवर राहणारे नामदेव श्रावण बेंडकुळे (वय ७३) यांचा या घटनेत खून झाला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शेत मशागत करतांना थोरला मुलगा हरिश्चंद्र हलगर्जीपणा करतो या कारणातून वृध्द वडिलांनी त्यास टोकले होते. यापूर्वीही वडिलांकडून त्यास रागावले जायचे. त्यामुळे संशयीताने हे कृत्य केले. सोमवारी (दि.२६) मध्यरात्री वडिल नामदेव बेंडकुळे हे आपल्या घरात झोपलेले असतांना संतप्त मुलाने त्यांच्या डोक्यात कु-हाडीने वार केला. त्यात त्यांचा मृत्यु झाला. ही घटना सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच हरसूल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत संशयीतास अटक केली असून याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.