चंदन तस्कर सक्रिय; घरासमोरील चंदनाचे खोड चोरट्यांनी कापून नेले
नाशिक : घरासमोरील चंदनाचे खोड चोरट्यांनी कापून नेल्याची घटना सुचितानगर भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अज्ञात चंदन तस्करांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय सुधाकर शिरसाठ (रा.प्लॉट नं.४२,पाण्याच्या टाकीजवळ,सुचितानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. शिरसाठ यांच्या घरासमोरील १४ ते १५ वर्षाचे सुमारे ३० हजार रूपये किमतीचे चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेले. ही घटना सोमवारी (दि.२६) उघडकीस आली. अधिक तपास हवालदार क्षिरसागर करीत आहेत.
दुचाकींच्या बॅट-या चोरी
नाशिक : शहरात भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून हाती लागेल ती वस्तू चोरटे चोरून नेत आहेत. जुन्या नाशिक भागातील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या तीन दुचाकींच्या बॅट-या चोरट्यांनी खोलून नेल्या. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूण ज्ञानेश्वर पाटील (रा.द्वारकापुरम सोसा.नानावली) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रविवारी (दि.२५) रात्री ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी द्वारका पुरम सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या बुलेटसह अन्य दोन दुचाकींच्या बॅट-या चोरून नेल्या. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
दोन दुचाकी चोरी
नाशिक : शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळया भागातील दोन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवीन आडगावनाका भागातील विशाल सुभाष दंडगव्हाळ (रा.श्रीहरी अपा.अभंगनगर) यांची एमएच १५ बीटी ३०८ मोटारसायकल गेल्या बुधवारी (दि.७) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत. दुसरी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. गजानन नगर येथील दिलीप शिवदास ठक्कर (रा.सातमाऊली रो हाऊस,शेलार सभागृहामागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ठक्कर यांची स्लेंडर एमएच १५ ईएम ३७०९ त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि.२५) रात्री घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पथवे करीत आहेत.