नाशिक : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सराफ बाजारातील एका सोसायटीतील घरफोडून चोरट्यांनी सुमारे ७० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे,पितळी वस्तू,कॅमेरे आणि कपड्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या भागात ४३ सीसीटीव्हींची नजर असून, सुरक्षारक्षक आणि हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असतानाही ही घटना घडली. सोसायटीतील अन्य घरांना बाहेरून कडी लावून घेत ही घरफोडी करण्यात आली आहे. या घटनेने सराफ बाजारातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल अंबादास चव्हाण (रा.श्री चिंतामण चेंबर्स,नगरकर लेन) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चव्हाण यांचे नगरकर लेन मधील लागून असलेल्या दोन सोसायटींमध्ये सदनिका आहेत. रविवारी (दि.२६) रात्री नजीकच्या घरात कुटूंबिय मुक्कामी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी संपूर्ण इमारतीतील सदस्यांच्या घरांना बाहेरून कडी लावून घेत चव्हाण यांचे घर फोडले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. इमारतीतील सर्वच घरांना कडी लावलेली असल्याचे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या निदर्शनास आले. त्याने काही ग्राहकांशी मोबाईलवर संपर्क साधला असता चव्हाण यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले. घरात शिरलेल्या चोरट्यांनी उस्तापास्तर करीत कपाटातील सोन्याचांदीचे दागिणे, रोकड ,पितळी मुर्ती दोन कॅमेरे आणि साड्या चोरून नेल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, चोरी केलेले साहित्य नेण्यासाठी चोरट्यांनी घरातील बॅगसुद्धा नेली. तसेच, जाताना जुना सॅण्डल ठेवून नवीन शूज घालून गेल्याचे समोर आले आहे. चोरीची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेजचा आधारे पोलिस चोरटयांचा शोध घेत असून अधिक तपास उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.