नाशिक – पंचवटी आणि मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी वेगवेगळ्या तीन चार चाकी वाहनांच्या मागील काचा फोडून सुमारे लाखांचा ऐवज चोरुन नेला. गाड्यांच्या काचा फोडून चोरीचे हे सत्र कारचालकांमध्ये खळबळ निर्माण करणारे आहे. पहिल्या घटनेत मुंबई नाका पोलिस ठाणा हद्दीत नवजीवन हॉस्पीटल लगतच्या तुपसाखरे लॉन्स समोर रविवारी (ता.२५) पावणे अकराच्या सुमारास चोरट्यांनी दोन चारचाकी वाहनांच्या डाव्या बाजूच्या खिडकीच्या काचा फोडून सुमारे पन्नास हजाराचा ऐवज चोरुन नेला. मयुर शशीकांत माने (वय ३०, कांचन अपार्टमेंट घुलेवडी संगमनेर) यांच्या हुंदाई आय २० चारचाकी (एमएच ११ सीक्यु २५५४) तसेच आदित्य राजेंद्र धुम्मा (वय ३१, शारदाश्रम सोसायटी दादर) यांच्या वोक्स वॅगन (एमएच १५ ईपी ०३९९) हिच्या मागील डाव्या बाजूच्या काच फोडून चोरट्यांनी अमेरिकन टुरिस्टर कंपनीची बॅग चोरुन नेली. तसेच हुंदाई कारमधील लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, सोनेरी रंगाचा आॅप्पो कंपनीचा मोबाईल, जिओ कंपनीचे सिमकार्ड असा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले.
तर पंचवटी पोलिस ठाणा हद्दीत दुस-या घटनेत फोग्स वॅगन गाडीची काच फोडून त्यातून डेल कंपनीचा लॅपटॉप चोरुन नेला. मुंबई आग्रा महामार्गावरील सर्व्हीस रोड वरील आशादीप मंगल कार्यालयाजवळ रविवारी (ता.२५) दुपारी एकला हा प्रकार उघडकीस आला. रामनाथ यादवराव काळे (वय ४६, कसबे सुकेणे) यांच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, रविवारी दुपारी एकच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी पंचवटीतील आशादीप मंगल कार्यालयाजवळ फोग्स वॅगन (एमएच १५ जीएफ १७६७) या कारच्या मागच्या खिडकीच्या काचा फोडून त्यातून काळ्या रंगाच्या पिशवीतील लॅपटॉप चोरुन नेला.