नाशिक : डोंगरावर फिरण्यासाठी गेलेल्या तिघा मित्रांना पिस्तूलचा धाक दाखवून टोळक्याने लुटल्याची घटना चांभारलेणी येथे घडली. या घटनेत सोन साखळीसह रोकड आणि मोबाईल असा अडीच लाखाचा ऐवज लुटारूंनी लांबविला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रीज अक्षय शहा (रा.विजय नगर कॉलनी,औरंगाबाद नाका) या तरूणाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मजेठिया व सिध्दांत शर्मा नामक दोन मित्रांसमवेत शहा रविवारी (दि.२) चांभारलेणी डोंगरावर फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जैन समाजाच्या लोखंडी शेड भागात तिघे मित्र फोटो काढत असतांना ही घटना घडली. तिघे मित्र आप आपल्या मोबाईलवर सेल्फी फोटो काढत असतांना चार जणांच्या टोळक्याने त्यांना गाठले. यावेळी हत्तीच्या दातासारखे दात ताईतात बांधलेल्या बुटक्या इसमाने आपल्या ताब्यातील पिस्तूल काढून तिघांना धमकावले. तसेच तिघा मित्रांना शिवीगाळ व मारहाण करीत
त्यांच्या गळयातील सोनसाखळी,खिशातील रोकड आाणि मोबाईल बळजबरीने हिसकावून लुटारू पसार झाले.अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.