मानेला कोयता लावून पैशासाठी अपहरण
नाशिक : तुरुंगातील साथीदारास सोडविण्यासाठी पैसे देत नाही या कारणातून रिक्षातून आलेल्या टोळक्याने धारदार कोयता मानेला लावून एकाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार मखमलाबाद गावात घडला. संशयीत पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांनी खूनाच्या उद्देशाने तरूणाचे अपहरण केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अपहृत इसमाच्या पत्नीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अपहरण करण्यात आलेला व्यक्ती शुक्रवारी (दि.२३) मखमलाबाद गावातील बस थांबा भागात उभा असतांना अॅटोरिक्षातून आलेल्या विकी उर्फ काळ्या कोयत्या व त्याच्या साथीदारांनी त्याचे एमएच १५ ईएच ३३०५ या अॅटोरिक्षातून त्याचे अपहरण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जेलमधील साथीदारास सोडण्यासाठी वारंवार पैसे मागूनही तू आम्हाला पैसे का देत नाही. या कारणातून वाद घालत टोळक्याने शिवीगाळ व मारहाण करीत तरूणाच्या मानेला धारदार कोयता लावून अॅटोरिक्षात बसवत बळजबरीने पळवून नेले. पोलीस सराईत संशयीतांचा शोध घेत असून हे अपहरण खूनाच्या उद्देशाने झाल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
सावरकरनगरला महिलेचे मंगळसूत्र ओरबडले
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना गंगापूर रोड वरील सावरकरनगर भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्पना राजेंद्र क्षीरसागर (वय ५०, रचना ट्रस्ट समोर, सावरकरनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. क्षीरसागर या शुक्रवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास फेरफटका मारून आपल्या घराकडे रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. मधुर स्वीट जवळील सागर पॅलेस समोरून त्या जात असतांना पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे व ९० हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.
जुन्या वादातून आडगावला एकाला मारहाण
नाशिक : जुन्या भांडणाच्या वादातून ४१ वर्षीय इसमास एकाने लोखंडी डिस्कने मारहाण केल्याची घटना तपोवन भागात घडली. याघटनेत सदर इसम जखमी झाला असून या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता किसन गायकवाड (रा. विजयनगर,आडगावनाका) असे मारहाण करणा-या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी सागर दत्तात्रय हिंगमिरे (४१ रा.राजपाल कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बुधवारी (दि.२१) रात्री हिंगमिरे तपोवनातील जोशी गॅस गोडावून नजीकच्या गायकवाड अॅटो पाईंट येथे गेले असता ही घटना घडली. संशयित दत्ता गायकवाड याने जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत, गाडीच्या लोंखडी डिस्कने सागर हिंगमिरे याच्या हातावर मारुन जखमी केले. अधिक तपास हवालदार थेटे करीत आहेत.