गुंगीचे औषध देऊन तरूणीवर बलात्कार
नाशिक : गुंगीचे औषध देऊन व नंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एकाने वेळोवेळी तरूणीवर तब्बल पाच वर्ष बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयीताने नांदविण्यास नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन विश्वास वाघ (रा.साईबाबानगर,सिडको) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार संशयित पवन याने जून २०१६ मध्ये गुंगीचे औषध देऊन जीडी सावंत कॉलेजजवळील श्री बल्लाळेश्वर अपार्टमेंट मधील एका सदनिकेत प्रथम बलात्कार केला. यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, २०१७ ते २०१९ दरम्यान हॉटेल सेलीब्रेशन, हॉटेल द पाम, डीजीपीनगर येथे तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. तसेच दम देउन तिला विवाह करण्यास भाग पाडले मात्र संबधित विवाहाची नोंदणी केली नाही. संशयीताने तरूणीस सोबत घेऊन जाण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास महिला उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.
पिकअपच्या हुलकावणीत रिक्षाचालक ठार
नाशिक : भरधाव पिकअपने हुलकावणी दिल्याने अॅटोरिक्षा झाडावर आदळून चालक ठार झाला. हा अपघात नाशिक पुणे मार्गावरील नेहरुनगर भागात झाला. या अपघातात रिक्षातील प्रवासी जखमी असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात पिकअप चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार मधुकर शेजवळ (वय ४४, रामनगर दत्तमंदीर) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती नुसार शुक्रवारी (दि. २३) दुपारच्या सुमारास रिक्षाचालक केदार शेजवळ हे आपल्या अॅटोरिक्षात (एमएच १५ एफयु ५८०४) द्वारका भागातून प्रवाशी भरून नाशिकरोडच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. नेहरुनगर परिसरातील घंटया म्हसोबा मंदीराजवळ भरधाव आलेल्या पिकअपने रिक्षाला कट मारला. त्यामुळे रिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात रिक्षाचालक शेजवळ यांचा मृत्यु झाला. तर अन्य प्रवासी जखमी झाले. प्रविण खरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.
समर्थनगरला एकाची आत्महत्या
नाशिक : मखमलाबाद शिवारातील समर्थनगर भागात राहणा-या ४० वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पांडूरंग विठ्ठल सासे (रा.गोकुळधाम सोसा.) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. पांडूरंग सासे यांनी शुक्रवारी (दि.२३) आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास पोलीस नाईक गावीत करीत आहेत.