पैशासाठी विवाह केल्याची तक्रार, तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल
नाशिक – शारीरीक दृष्टया अकार्यक्षम असल्याचे लपवून ठेवून आर्थिक फायद्यासाठी एकाने महिलेशी विवाह केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत विवाहीतेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आला असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जय हरसुखलाल चौहान (वय ३५, शिखरेवाडी) या पतीसह सासरच्या तीन जणांविरूध्द याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या सहा सात महिन्यापूर्वी विवाह झालेल्या पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयिताला वेरॉसिकल वेन्स, सिप्लीस आजार असल्याने तो वैवाहीक संबध प्रस्थापित करण्यास सक्षम नसल्याचे माहीती असूनही, संगनमताने माहिती लपवून ठेउन आर्थिक फसवणूकीसाठी हा विवाह लावण्यात आला. याबाबत पीडितेने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता सासरकडील मंडळीकडून पैश्यांची मागणी करीत तिचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच झोपेच्या गोळ्या तोंडात कोंबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.
दुचाकी घसल्याने एकाचा मृत्यु
नाशिक – भरधाव दुचाकी घसरल्याने डबलसिट बसलेल्या ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला. हा अपघात दिंडोरी रोड वरील मोराडे जल सेवा समोरील वडाच्या झाडाजवळ झाला. याप्रकरणी दुचाकीचालकाविरूध्द म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत नामदेव खैरनार (वय ४४, मोराडे गल्ली म्हसरुळ) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार वसंत खैरनार सोमवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास रघुनाथ सुरेश खैरनार यांच्या दुचाकीवर (एमएच १५ डीई ५३७९) पाठीमागे बसून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. दिंडोरी रोडने म्हसरुळच्या दिशेने दुचाकीवर प्रवास करीत असतांना मोराडे जलसेवा समोरील वडाच्या झाडाजवळ भरधाव दुचाकी घसरली. या अपघातात खैरनार गंभीर जखमी झाले होते. त्यात त्यांचा मृत्यु झाला. मुलगा दीपक खैरनार यांच्या तक्रारीवरुन दुचाकीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार रोकडे करीत आहेत.
कामगारनगरला घरफोडी
नाशिक – औद्योगीक वसाहतीलील कामगारनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ५३ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह मोबाईल आणि घड्याळाचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थॉमस मणी मत्ताकातू (वय ६३, गुलमोहर कॉलनी कामगारनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मत्ताकातू कुटूंबिय दि. ९ ते ११ जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीचे गज कापून कपाटातील ४० हजाराची रोकड, दोन मोबाईल आणि एक घड्याळ असा सुमारे ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास जमादार सय्यद करीत आहेत.