घरकूल योजनेच्या नावाने मंगळसूत्र लांबविले
नाशिक – घरकुल योजनेत सदनिका मंजूर झाल्याची बतावणी करीत भामट्याने महिलेची सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील संजीवनगर भागात घडली. संशयीताने महापालिकेचा कर्मचारी असल्याचे सांगून हा गंडा घातला असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या शिवा गोसावी (वय २५,निळकंठ रो हाउस, संजीवनगर नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गोसावी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुरुवारी (दि. २२) दुपारी साडे बाराच्या सुमारास त्या आपल्या घरी एकटया असतांना काळ्या रंगाचा टीशर्ट व पॅट घातलेल्या भामट्याने त्यांना गाठले. महापालिकेला कर्मचारी असल्याचे सांगून घरकूल योजनेत तुमच्या कुटूंबियांना अडीच लाख रुपये मंजूर झाल्याचे सागितले. यावेळी त्याने घरातील मुख्य व्यक्तीचा मोबाईल नंबर द्या. त्यांच्याशी बोलून घेतो असे सांगून सास-याचा नंबर घेतला. सास-यांशी बोलत असल्याचे भासवून त्याने सोन्याचे सुमारे ७० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र महिलेकडून आपल्या ताब्यात घेतले. सास-यांनी मंगळसूत्र आपणास द्यायला लावले अशी बतावणी करीत त्याने मंगळसूत्र पदरात पाडून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
घराच्या बांधकामावरून शेजा-याला मारहाण
नाशिक – आपल्या बाजूने आलेला घराचा स्लॅब काढून घेण्याची मागणी केल्याने संतप्त तिघांनी शेजा-याला बेदम मारहाण केल्याची घटना शिंगवे बहुला येथील अंबडवाडी भागात घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष देवराम निसाळ (वय ३०) राजूबाई देवराम निसाळ, (वय ५० रा.दोघे अंबडवाडी) व एक मिस्त्री अशी संशयितांची नावे आहे. याप्रकरणी प्रथमेश विजय झाडे (वय २६, अंबडवाडी शिंगवेबहुला) यांनी तक्रार दाखल केली आहे. झाडे यांच्या तक्रारीनुसार संशयीतांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. निसाळ यांचा स्लॅबचे बांधकाम तक्रारदार यांच्या दिशेने बाहेर काढण्यात आल्याने गेल्या गुरूवारी (दि. १५) झाडे संबधीतांना समजून सांगण्यासाठी गेले असता ही घटना घडली. आमच्या बांधकामाला अडचण येईल हा स्लॅब काढून घ्या असे सांगितल्याने संतप्त संतोष निसाळ याने डोक्यात वीट मारून फेकली. तर अन्य दोघांनी शिवीगाळ करीत, लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी तक्रारदाराची आई त्याच्या मदतीस धावून गेली असता तिघांनी तिलाही मारहाण केली. अधिक तपास जमादार हांडोरे करीत आहेत.