घर घेवून देण्याच्या बहाण्याने ३० लाखास गंडविले
नाशिक : शासनाच्या म्हाडा स्किममध्ये स्वस्तात घर मिळवून देण्याच्या बहाण्याने भामट्याने दांम्पत्यासह त्यांच्या परिचितांना तब्बल ३० लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर सरोदे (रा. फ्लॅट नं.१०९ हरिविश्व कारडा कन्स्ट्रक्शन,पाथर्डी फाटा) असे गंडा घालणा-या संशायीताचे नाव आहे. याप्रकरणी नितीन प्रभाकर भोळे (रा.मेट्रोझोन जवळ वडाळा गाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयीताने १ फेब्रुवारी २०१९ ते १ मे २०२१ दरम्यान हा गंडा घातला आहे. संशयीताने भोळे यांना गाठून म्हाडा कार्यालयात आपले मोठे वजन असल्याचे भासवून हा गंडा घातला आहे. शहरात सुरू असलेल्या म्हाडा स्किममधील सदनिका विक्रीची जाहिरात तक्रारदारांना दाखवून ही फसवणुक करण्यात आली आहे. म्हाडा मध्ये स्व:स्तात सदनिका घेवून देतो असे आमिष दाखवून संशयीताने प्रथम भोळे यांच्याकडून दोन घर घेवून देण्याच्या मोबदल्यात ९ लाख घेतले. यापाठोपाठ भोळे यांच्या मेव्हणी भावना कोल्हे यांनीही घर घेण्यासाठी संमत्ती दर्शविल्याने त्यांच्या कडूनही साडे चार लाख रूपये उकळण्यात आले. तसेच भोळे यांचे परिचीत वंदना चौधरी,पुष्पा पवार आणि गायत्री महाले यांनीही अनुक्रमे सहा लाख,चार लाख २० हजार व ५ लाख १५ हजार रूपये संशयीताच्या स्वाधिन केले. या घटनेत २८ लाख ८५ हजार रूपयांना गंडविण्यात आले असून, बराच काळ उलटूनही घर अथवा पैसे न मिळाल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे.अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.
….
दुकानातील सामानावर नोकराचा डल्ला
नाशिक : मुर्तीच्या दुकानात कामास असलेल्या परप्रांतीय नोकराने मालकाच्या सायकलसह दुकानातील सामानावर डल्ला मारल्याची घटना मखमलाबाद शिवारात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांतीलाल नोने कालू (रा.उदयपूर,राजस्थान) असे संशयीत नोकराचे नाव आहे. याप्रकरणी विवेक रमेश सोनवणे (रा.मखमलाबाद रोड)यांनी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे यांचे सुयोजीत गार्डनकडून मखमलाबदकडे जाणा-या मार्गावर वास्तूशिल्प नावाचे दुकान आहे. या दुकानात संशयीत कामास होता. गेल्या मंगळवारी (दि.२७) रात्री संशायीताने हा डल्ला मारला. संशयीताने रात्रीच्या वेळी मालक दुकानात नसल्याची संधी साधत त्याने गिअरची सायकल,तीन ग्राईंडर मशिन व लेदर शुज असा सुमारे ५४ हजार ८०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार शेवरे करीत आहेत.
….
पाटात महिलेचा मृतदेह
नाशिक : पाटाच्या पाण्यात महिलेचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर महिला कॅन्सर आजाराने त्रस्त होती. तिने आत्महत्या केल्याची चर्चा असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सरला सुनिल धुमाळ (२८ रा.मौनगिरीरोड,हिरावाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिला कर्करोगाने त्रस्त होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या आई कडे राहत होती. शानिवारी (दि.१) घरात कुणासही काही एक न सांगता ती घराबाहेर पडली होती. दुपारच्या सुमारास तिचा मृतदेह आाडगाव शिवारातील पाटाच्या पाण्यात वाहून जात असतांना मिळून आला. पोलीस पाटील मते यांच्या घरासमोरच ही घटना उघडकीस आली. सदर महिलेने आजारपणास कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत