हॉटेलवर छापा; बेकायदा दारू जप्त, हॉटेल मालकाविरूध्द गुन्हा दाखल
नाशिक : शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा दारू विक्री होत असून, औरंगाबाद रोडवरील एका हॉटेलवर छापा टाकून पोलीसांनी देशी विदेशीसह वाईन आणि बिअरचा साठा हस्तगत केला. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. याप्रकरणी हॉटेल मालकाविरूध्द आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद रोडवरील अनेक हॉटेलमध्ये बेकायदा मद्यविक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानूसार नांदूर शिवारातील दख्खन करी या हॉटेलवर मंगळवारी (दि.२०) छापा टाकला असता बेकायदा मद्यविक्री होत असल्याचे समोर आले. या हॉटेलमध्ये परवाना नसतांना दारू विक्री केली जात होती. घटनास्थळावरून देशी विदेशीसह बिअर आणि वाईन असा सुमारे २० हजार ३४० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. युनिटचे पोलीस नाईक रावजी मगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हॉटेल मालक धनंजय विनोद पाण्डेय याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार थेटे करीत आहेत.
किरकोळ कारणातून बापलेकास मारहाण
नाशिक : किरकोळ कारणातून एकाने लोखंडी गजाने बापलेकास बेदम मारहाण केल्याची घटना सातपूर राजवाड्यात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक बाळासाहेब काळ (रा.राजवाडा,सातपूर) असे बापलेकास मारहाण करणा-या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी अमित उत्तमराव जाधव (२० रा.सदर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. गेल्या मंगळवारी (दि.१३) सायकांळच्या सुमारास ही घटना घडली. जाधव यांच्या घरासमोर लहाण मुले गोंधळ घालत असल्याने युवकाने त्यांना हटकले असता संशयीताने घरातून लोखंडी गज काढून आणत युवकासह त्याच्या वडिलांना बेदम मारहाण केली. या घटनेत बापलेक जखमी झाले असून अधिक तपास पोलीस नाईक सुर्यवंशी करीत आहेत.