अॅटोरिक्षाच्या धडकेत एक ठार
नाशिक : भरधाव अॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला. हा अपघात औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात झाला. विशेष म्हणजे अॅटोरिक्षा विधी संवर्धीत बालक चालवित होता. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक मुरलीधार पवार (४० रा.आयटीआय कॉलनी,कार्बननाका) असे अॅटोरिक्षाच्या धडकेत ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिपक पवार गेल्या रविवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास महादेव मंदिर परिसरातील रिक्षा थांब्यावर आपल्या मित्रासमवेत गप्पा मारत असतांना हा अपघात झाला होता. शिवीजानगर कडून सातपूरच्या दिशेने भरधाव जाणा-या एमएच १५ झेड ५९२६ या अॅटोरिक्षाने पवार यांना धडक दिली. चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ मॅग्नम हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी पत्नी मंदा पवार यांनी तक्रार दाखल केली असून, त्यात रिक्षा मालकाने अल्पवयीन मुलाकडे परवाना अथवा वाहन चालविण्याचे प्रशिक्षण नसतांना त्याच्या ताब्यात रिक्षा दिल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेंडकर करीत आहेत.
पळसे येथे महिलेची आत्महत्या
नाशिक : पळसे ता.जि.नाशिक येथील ३५ वर्षीय महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. ज्योती मालोजी गायधनी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ज्योती गायधनी यांनी मंगळवारी (दि.२०) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला नजीकच्या जयराम हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना तिचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार उजागरे करीत आहेत.
घरफोडीत पासपोर्टसह रोकड चोरी
नाशिक : शरणपूररोड भागात राहणा-या डॉक्टरचे घरफोडून चोरट्यांनी विदेशी वास्तव्याच्या परवान्यासह रोकड चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.किरण सुरेद्रनाथ बरसे (रा.सुध्दोधन अपा.ठक्करनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बरसे कुटूंबिय १७ ते १९ जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीचे गज कापून बेडरूममधील कपाटातून आठ हजाराची रोकड आणि विदेशी वास्तव्याचा परवाना आणि महत्वाचे कागदपत्र चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.