नाशिक : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सण उत्सवात डोकेदुखी ठरणा-या शहरातील १९ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शहर पोलीसांनी चार दिवसांसाठी हद्दपार केले आहे. त्यात भद्रकाली १३ व मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील ६ जणांचा समावेश आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना यांनी केली आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना शहर पोलीसांनी आपल्या रडारवर घेतले असून, अल्पावधीतच शेकडो गावगुंडाना हद्दपार करण्यात आले आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग २ अंतर्गत येणा-या भद्रकाली आणि मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांची यादी तयार करून पोलीसांनी ही कारवाई केली असून संबधीताना २० ते २४ जुलै दरम्यान चार दिवसांसाठी आयुक्तालय हद्दीतून तडीपार करण्यात आले. प्राणी संरक्षण कायदा १९७६ मधील विविध कलमान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.