नाशिक : शहर व परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून, वेगवेगळय़ा भागात राहणा-या पाच जणांनी कुठल्या तरी नैराश्यातून आत्महत्या केली. आत्महत्या करणारे २० ते ३० वयोगटातील असून, त्यात एका तरूणीसह चार तरूणांचा समावेश आहे. संबधीतांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दोघांनी विषारी औषध सेवन करून तर अन्य चौघांनी गळफास लावून आत्महत्या केली. जेलरोड भागातील जय अंबे कॉलनीत राहणा-या सागर दौलत जाधव (३० रा.गोपी अपा.) या युवकाने ३ मे रोजी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. खासगी रूग्णालयात दिर्घकाळ त्याच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी (दि.१९) त्याची प्रकृर्ती बिघडल्याने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.
दुसरी घटना वाघाडी भागात घडली. शितल राजेंद्र भोये (२० मुळ रा.पांगरी ता.सिन्नर हल्ली,संजयनगर वाघाडी) या युवतीने सोमवारी (दि.१९) आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. सदर तरूणीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. तिसरी घटना पंचवटीत घडली. उदय सुरेश निकुंभ (३० रा.तिडकेनगर) याने सोमवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास पंचवटीतील आपल्या प्लॉटवर बांधलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. मित्र निलेश गरूड यांनी त्यास तात्काळ उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. दोन्ही घटनांप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक फुलपगारे करीत आहेत.
सिडकोतील धन्वंतरी मेडिकल कॉलेज भागात राहणा-या कुणाल जयवंत पवार (२१ रा.सखाराम बिल्डींग,एकदंत चौक) या युवकाने घरातील किचनमध्ये हुकाला कपडा बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी प्रमोद फुलपगार यांनी दिलेल्या खबर दिली. तर अंबड गावातील एकदंत नगर भागात राहणा-या संदिप मेघा वसावे (२० रा.बोरीचा मळा) या युवकाने सोमवारी (दि.१९) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या लोखंडी अॅगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. धनंजय दातीर यांनी याबाबत खबर दिली. दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास पोलीस नाईक संगम आणि हवालदार माने करीत आहेत.