गुंगीचे औषध देवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नाशिक : देवदर्शनाच्या बहाण्याने दुचाकीवर घेवून जात एकाने गुंगीचे औषध देवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना त्र्यंबकेश्वर मार्गावर घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास बेड्या ठोकल्या आहेत. रोहित आनंद म्हसदे (२५ रा.मायको दवाखान्याजवळ,फुलेनगर) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. पंचवटी परिसरात राहणा-या अल्पवयीन मुलीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयीत आणि मुलगी एका ठिकाणी काम करतात त्यातून दोघांची ओळख झाली होती. रविवारी (दि.१८) सुट्टी असल्याने संशयीताने देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्वर येथे जाण्याचा बहाणा केला. सकाळच्या सुमारास पेठरोडवरील उन्नती शाळा येथून मुलगी त्याच्या सोबत दुचाकीवर गेली होती. त्र्यंबकेश्वर पासून काही अंतरावरील एका हॉटेल मध्ये घेवून जात संशयीताने हे कृत्य केले. कोको कोलाच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकून संशयीताने हॉटेलमध्ये बळजबरीने बलात्कार केली. ही बाब लक्षात येताच पीडितेने पंचवटी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली असून पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे. अधिक तपास महिला उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
कोयत्याचा धाकदाखवून दोघा मित्रांना लुटले
नाशिक : धारदार कोयत्याचा धाक दाखवून दुकलीने दोघा मित्रांना लुटल्याची घटना औरंगाबाद रोडवरील तपोवन मार्गावर घडली. या घटनेत भामट्यांनी कॅमे-यासह बॅग पळविली असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीलुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय सुरेश आहेर (१८ रा.शिवपार्क कॉलनी,अंबड पाथर्डीरोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. अजय आहेर आणि नितीन चोथे नामक दोघे मित्र सोमवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास औरंगाबाद रोड परिसरात गेले होते. जनार्दन स्वामी मठ परिसरातील तपोवन नर्सरी मार्गावर ते फोटो काढत असतांना ही घटना घडली. एमएच १५ जीवाय ८४९६ या अॅक्टीव्हावर आलेल्या संशयीतांने आपल्या साथीदारास बोलावून घेत ही लुटमार केली. फोटो काढायचे आहेत असे सांगून दोघा मित्रांना थांबवून ठेवण्यात आले होते. धारदार शस्त्र घेवून आलेल्या साथीदाराने शिवीगाळ करीत आहेर व चोथे यांना धारदार कोयता व चाकूचा धाक दाखवित कॅमे-याची बॅग बळजबरीने हिसकावून पोबारा केला. बॅगेत निकॉनचा कॅमेरा व लेन्स असा सुमारे २२ हजार रूपये किमतीचा ऐवज होता. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बिडगर करीत आहेत.