नाशिक : पोलीसांचे खबरी असल्याच्या संशयातून सराईतांनी दोघा भावांना बेदम मारहाण करीत एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना अमृतधाम भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी दोघा सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.
सागर उर्फ काळू रमेश गायकवाड व अंकुश रमेश गायकवाड (रा. दोघे सुर्यपूत्र सोसा.आयोध्यानगर) अशी संशायीतांची नावे असून त्याविरूध्द पंचवटी,भद्रकाली आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी मनोज नेमिचंद छाजेड (रा.सुर्यपूत्र सोसा.आयोध्यानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार आणि संशायीत एकाच सोसायटीतील रहिवाशी असून छाजेड बंधू वेळोवेळी माहिती पुरवित असल्याच्या संशयातून हा हल्ला झाला. ३० एप्रिल रोजी सायंकाळच्या वेळी मनोज छाजेड व त्यांचे बंधू राजेश छाजेड आपल्या घरी असतांना सराईत गुन्हेगार असलेल्या गायकवाडांनी त्यांना गाठले. यावेळी तुम्ही आमच्याबाबत पोलीसांना खबर देता का या कारणातून वाद घालत दोघा संशयीतांनी शिवीगाळ करीत दोघा भावांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रसंगी संतप्त सागर गायकवाड याने सोबत आणलेल्या कोयत्याने मनोज छाजेड यांच्यावर सपासप वार केले. या घटनेत छाजेड जखमी झाले असून अधिक तपास पोलीस नाईक भोळे करीत आहेत.
..