नाशिक : दरोड्यात एकाचा खून करून पसार झालेल्या उस्मानाबाद येथील दरोडेखोरास नाशिक पोलीसांनी जेरबंद केले. संशयीत शहरातील सिग्नलवर फुलांचे गजरे विक्री करून कुटूंबियांचा उदनिर्वाह करीत होता. ही कारवाई मुंबईनाका पोलीसांनी केली असून, त्यास उस्मानाबाद पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
सुनिल नाना काळे (२७ रा.पारधी पेढी ता.कळम,उस्मानाबाद) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. गेल्या ५ मे रोजी उस्मानाबाद जिह्यातील कळम तालूक्यात धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. त्यात एका सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कळम पोलीस ठाण्यात दरोड्यासह खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उस्मानाबाद पोलीस दरोडेखोरांच्या मागावर असतांनाच नाशिक पोलीसांनी ही कारवाई केली. उस्मानाबाद जिह्यातील अनेक कुटूंबिय नाशिक शहरातील सिग्नलवर गजरे विक्री करीत असल्याच्या माहितीवरून कळम पोलीसांचे पथक दोन दिवसांपूर्वी शहरात दाखल झाले होेते. या पोलीसांकडून मिळालेल्या माहितीवरून मुंबईनाका पोलीसांची यंत्रणा कामाला लागली होती.
वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी किनारा हॉटेल पाठीमागील नंदिनी नदी किनारी संशयीतास बेड्या ठोकल्या असून त्याने गुह्याची कबुली दिली आहे. घटनेनंतर संशयीताने नाशिक गाठून सिग्नल परिसरात गजरा विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता.त्यास उस्मानाबाद पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कामगिरी निरीक्षक चंद्रकांत अहिरे,सहाय्यक निरीक्षक के.टी.रोंदळे,हवालदार सोनार,पोलीस नाईक डोंगरे,डंबाळे शिपाई पानवळ,आव्हाड,गायकवाड व पवार आदींच्या पथकाने केली.