कारमधून बेकायदा मद्याची वाहतूक, अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत
नाशिक : शहरातील बेकायदा मद्यविक्री आणि वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, विनापरवाना देशी विदेशी दारूची वाहतूक करणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. याकारवाईत कारसह देशी विदेशी दारू असा सुमारे अडीच लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महम्मद रूमान अहमद शेख (रा.नागजी हॉस्पिटलजवळ,वडाळारोड) असे बेकायदा मद्याची वाहतूक करणा-या संशयीताचे नाव आहे. नाशिक पुणे मार्गावरून मोठ्याप्रमाणात बेकायदा मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उपनगर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.१६) आंबेडकरनगर सिग्नल भागात सापळा लावण्यात आला होता. भरधाव कार आडवून पोलीसांनी तपासणी केली असता त्यात देशी विदेशी मद्यसाठा मिळून आला. पोलीसांनी संशयीता ताब्यात घेत कारसह सुमारे अडिच लाख रूपये किमतीचा दारू साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश भागवत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत.
…
दुचाकीच्या धडकेत वृध्दा ठार
नाशिक : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ६० वर्षीय महिला ठार झाली. हा अपघात जिल्हापरिषद परिसरात झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. कनिज आरीफ खान (६० रा.मिल्लतनगर,वडाळारोड) असे दुचाकीच्या धडकेत ठार झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. कनिज खान या बुधवारी (दि.१४) खडकाळी सिग्नल कडून त्र्यंबकनाक्याच्या दिशेने पायी जात असतांना जिल्हापरिषदेसमोर पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १५ एजे ३७१८ या दुचाकीने त्यांना धडक दिली होती. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी मिसबा खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
….