दुचाकीस्वारांनी एकास लुटले
नाशिक : अॅटोरिक्षाची प्रतिक्षा करणा-या प्रवाशास मदतीचा बहाणा करून दुचाकीस्वारांनी लुटल्याची घटना कन्नमवार पुलाखाली घडली. याघटनेत भामट्यांनी मारहाण करीत प्रवाश्याची रोकड व घड्याळ पळविले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल सुकदेवराव शेंडगे (४८ रा.बळीमंदिराजवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शेंडगे बाहेरगावी गेले होते. बुधवारी (दि.१४) ते बळी मंदिर भागात जाण्यासाठी द्वारका सर्कल येथील धुळे थांब्यावर अॅटोरिक्षाची प्रतिक्षा करीत थांबले असता ही घटना घडली. मोपेड दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. यावेळी कुठे चाललात अशी विचारपूस करून आम्हालाही तिकडेच जायचे आहे. चला आापण ट्रिपलसिट जावू असे म्हणत संशयीतांनी शेंडगे यांना दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. यानंतर कन्नमवार पुलाखाली नेवून शेंडगे यांना मारहाण करीत भामट्यांनी त्यांच्या खिशाातील अडीच हजाराची रक्कम,घड्याळ व हातातील बॅग असा सुमारे ४ हजाराचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मोहिते करीत आहेत.
….