मोलकरणीचा रोकडसह लाखोंच्या दागिण्यावर डल्ला
नाशिक : घरात कुटूंबिय नसल्याची संधी साधत मोलकरणीने रोकडसह लाखोंच्या दागिण्यावर डल्ला मारल्याची घटना तिडके कॉलनीतील मातोश्रीनगर भागात घडली.याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीत महिलेस बेड्या ठोकल्या आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राणी शिवराम पिंगळे (रा.कोळीवाडा,सातपूर) असे अटक केलेल्या संशयीत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वैशााली सोनवणे (रा.ड्रीम ग्रान्डीयर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पिंगळे ही महिला सोनवणे यांच्या घरी घरकाम करते. सोनवणे कुटूंबियांची नातेवाईक महिलेचा मृत्यु झाल्याने ते बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. १८ एप्रिल ते १४ जुलै दरम्यान घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयीत महिलेने बेडरूममधील कपाटात ठेवलेली १५ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४ लाख १० हजाराचा ऐवज हातोहात लांबविला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
…..
गंगाघाटावर कोयताधारी जेरबंद
नाशिक : गंगाघाटावर धारदार कोयता घेवून फिरणा-या तरूणास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीत पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या ताब्यातून कोयता जप्त करण्यात आला आाहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रताप उर्फ बब्बी अशोक खाकोडीया (२७ रा. शेरे मळय़ा समोर,गणेशवाडी) असे अटक केलेल्या संशायीताचे नाव आहे. बुधवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास गोदाघाट परिसरात दिनदिक्कतपणे एक तरूण हातात धारदार कोयता घेवून फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पंचवटी पोलीसांनी धाव घेतली असता संशयीतास गोदावरी हॉटेल समोर बेड्या ठोकण्यात आल्या. संशयीताच्या ताब्यात कोयता मिळून आला असून अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.
…..